मंत्री हसन मुश्रीफ (File photo)
कोल्हापूर

Hasan Mushrif | ‘गोकुळ’ महायुती म्हणूनच लढणार, चेअरमनही करणार; सतेज पाटलांनी काय करावे, हा त्यांचा प्रश्न

मंत्री मुश्रीफ : सप्टेंबरमध्ये निवडणूक होण्याची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची (गोकुळ) निवडणूक महायुती म्हणूनच लढणार, ती जिंकणार आणि महायुतीचाच चेअरमन करणार, असा ठाम विश्वास वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी बुधवारी व्यक्त केला. कोल्हापूर विमानतळावर ते पत्रकारांशी बोलत होते.

आमदार सतेज पाटील यांनी राजर्षी शाहू समविचारी शेतकरी आघाडी स्थापन केली आहे. त्यांनी आघाडीची भूमिका सांगणारे पत्र संस्थांना वाटप करून एकप्रकारे प्रचारही सुरू केला आहे. याबद्दल विचारता, मुश्रीफ म्हणाले, त्यांनी काय करावे हा त्यांचा प्रश्न आहे आणि आम्ही महायुतीने काय करावे, हा आमचा प्रश्न आहे. महायुती म्हणूनच गोकुळमध्ये लढणार, हे आधीच जाहीर केले आहे. ही निवडणूक महायुती म्हणून लढायची, जिंकायची आणि चेअरमन महायुतीचाच करायचा हे ठरलेले आहे. त्यानुसार ते होईलच असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मुश्रीफ म्हणाले, गोकुळ निवडणुकीसाठी कच्ची व पक्की मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. पहिल्या टप्प्यात संस्थांकडून ठराव जाणे आणि व्यक्तींचे ठराव पाठवले जातील. त्यानंतर स्वतंत्र ठराव पाठवले जातील. दोन्ही याद्या पूर्ण झाल्यानंतर निवडणूक लागेल. गोकुळची ही निवडणूक सप्टेंबर महिन्यात लागण्याचा अंदाज आहे. ज्यांनी निवडणूक पुढे ढकलण्याचा प्रयत्न केला त्यांना ही चपराक बसली आहे का असे विचारता मुश्रीफ म्हणाले चपराक बसली असे म्हणता येणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक वेळेवर घ्या, असे सांगितल्याने गोकुळची ही निवडणूक वेळेवरच होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

जागावाटपाचा निर्णय मुख्यमंत्र्यांसमोर सुटेल

गोकुळ दूध संघाच्या उमेदवारीसाठी सव्वाशे ते दीडशे ठरावांची जुळणी हवी, यावरून ठिणगी पडली आहे का, याबाबत विचारता मुश्रीफ म्हणाले, असे ठिणगी वगैरे काही नाही. हे सर्व ठराव झाल्यानंतर याबाबतची सर्व परिस्थिती मुख्यमंत्र्यांकडे सांगू आणि तेच उमेदवारीबाबत निर्णय घेतील. जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही. मतदार यादी अंतिम झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांसमोर जागावाटपाचा विषय सुटेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT