कोल्हापूर : महापालिकेत काँग्रेसला टक्कर देण्यासाठी महायुतीला एकत्रच लढावे लागले. जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये मात्र ज्या ठिकाणी जमणार नाही, तेथे मैत्रीपूर्ण लढत करूया. परंतु, हे करताना मित्र पक्षांवर आरोप करणे सर्वांनीच टाळले पाहिजे, असे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पदवीधर मतदार नोंदणी व सभासद नोंदणी आढावा बैठक शुक्रवारी मार्केट यार्ड येथील पक्षाच्या कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. यावेळी मुश्रीफ बोलत होते. बैठकीस पावसातदेखील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्ह्यातून पदवीधरांची नोंदणी इतकी करा की, उमेदवारीसाठी भैया माने यांच्याशिवाय दुसर्या नावावर चर्चादेखील होता काम नये, असे मुश्रीफ म्हणाले.
जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस एक नंबरचा पक्ष आपणास बनवायचा आहे. कै. पी. एन. पाटील गटाची ताकद आता आपल्याला मिळणार आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांना आपण सर्वांना सांभाळायचे आहे. राहुल पाटील, राजेश पाटील यांना आपण प्रामाणिकपणे ताकद द्यायची आहे, असेही मुश्रीफ म्हणाले. यावेळी जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, माजी आ. के. पी. पाटील, राजेश पाटील, ‘गोकुळ’चे संचालक किसन चौगुले, कार्याध्यक्ष अनिल साळोखे, शहराध्यक्ष आदिल फरास, भैया माने, रामेश्वर पत्की आदींची भाषणे झाली. बैठकीस ‘गोकुळ’चे अध्यक्ष नविद मुश्रीफ, संचालक युवराज पाटील, महिला जिल्हाध्यक्ष शीतल फराकटे आदी उपस्थित होते.
विधानसभा मतदारसंघांची येत्या निवडणुकीत पुनर्रचना होणार आहे. यामध्ये तीन मतदारसंघ वाढण्याची शक्यता आहे. विधानसभेचे 13 मतदार संघ होतील. 25 लाख दूध संकलनाचा संकल्प वडिलांनी केलाय तो मुलगा पूर्ण करेल. काँग्रेसचे दहा माजी आमदार भाजपमध्ये गेले, राहुल पाटील राष्ट्रवादीत आल्यामुळे सतेज पाटील यांनी एवढं हळवं होण्याची गरज नव्हती.