कोल्हापूर : आपली आ. सतेज पाटील यांच्याशी मैत्री आहे, ती राहणार आहे. त्यांनी संयमाने घ्यावे, राजकारणातील प्रसंगांना धीरोदात्तपणे तोंड द्यावे, असा सल्ला वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला. मैत्रीदिनादिवशी दिलेला हा सल्ला ते आत्मसात करतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
मुश्रीफ म्हणाले, दिवंगत आ. पी. एन पाटील यांचे सुपुत्र राहुल आणि राजेश पाटील तसेच त्यांचा सर्व गट यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचे निश्चित झाले आहे. कोल्हापुरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत 25 ऑगस्ट रोजी हा प्रवेश होईल. पी. एन. पाटील यांचा सर्व गट राष्ट्रवादीत येण्यामुळे राधानगरीतील काही कार्यकर्ते ते फोडण्याचा प्रयत्न करीत आहेत.
ते म्हणाले, एकवेळी जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच आमदार आणि दोन खासदार होते. आता मी पक्षाचा एकटाच आमदार आहे. अनेक मंडळी सोडून गेली; परंतु असा आक्रस्ताळेपणा आम्ही कधीही केलेला नाही. असेल त्या परिस्थितीला धीरोदात्तपणे सामोरे जात आहोत. त्यामुळे सतेज पाटील यांनी असे करण्याची आवश्यकता नाही. त्यांनी ‘सत्तेसाठी ते जात आहेत’ हे राधानगरीत केलेले व्यक्तव्य करवीरमध्येही जाऊन केले.
मतभेद जरूर असावेत; परंतु मनभेद नसावेत. पी. एन. पाटील गट काँग्रेस सोडून राष्ट्रवादीमध्ये का जात आहे, याचं संशोधन झाले, तर त्याला वेगळे वळण लागेल. म्हणून आ. पाटील यांनी संयमानं घ्यावे. त्यांनी एवढं हळवं होण्याची गरज नाही, असा सल्ला दोनच दिवसांपूर्वी दिला होता, असेही मुश्रीफ म्हणाले.
आज बानगे येथे पायी वारीला गेलेल्या विणेकरी व तुळशीवाल्या माऊलींचा पूजन सोहळा माझ्या हस्ते झाला. एवढ्या आनंदाच्या आणि पवित्र दिवशी आ. पाटील यांच्याबाबत अशी प्रतिक्रिया द्यावी लागणं, हे माझं दुर्दैव म्हणावं लागेल, असेही मुश्रीफ म्हणाले.