कोल्हापूर : सीपीआर येथील सर्जिक आयसीयूच्या लोकार्पणप्रसंगी मंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश क्षीरसागर, जिल्हा अधिकारी डॉ. विजय राठोड, आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड, सीओई जॅसमिन, अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे आदी.  (छाया ः मिलन मकानदार)
कोल्हापूर

Hasan Mushrif | सीपीआरमध्ये दर्जेदार, आधुनिक उपचार सेवा : मंत्री मुश्रीफ

रुग्णाला खासगी दवाखान्यात जावे लागणार नाही; विविध सुविधांचे लोकार्पण

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : सीपीआरचा कायापाटल सुरू आहे. आता दर्जेदार उपचार व आधुनिक सुविधांमुळे भविष्यात जिल्ह्यातील रुग्णांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात जावे लागणार नाही, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. शुक्रवारी येथील विविध सेवा सुविधांच्या लोकार्पण सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर होते.

मंत्री मुश्रीफ म्हणाले, सीपीआर हेरिटेज इमारतीचे नूतनीकरण सुरू आहे. जूनच्या पाहिल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत लोकापर्ण करणार आहे. शेंडा पार्कमधील कामे मार्च 2027 पर्यंत पूर्ण होतील. जिल्हाधिकारी, आयुक्त आणि जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रकल्पाच्या कामांकडे वैयक्तिक लक्ष द्यावे, अशी सूचनाही मंत्री मुश्रीफ यांनी केली.

अध्यक्षीय भाषणात आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, मंत्री मुश्रीफ यांनी सीपीआरसाठी भरीव निधी उपलब्ध केला. जनतेचे श्रावण बाळ आता ‘आरोग्य दूत ’ म्हणून ओळखले जात आहेत. महापौर रूपाराणी निकम, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांची भाषणे झाली. मान्यवरांच्या हस्ते चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांना नियुक्तपत्रे देण्यात आली. स्वागत व प्रास्ताविक अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे यांनी केले. जि.प.च्या मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन, वैद्यकीय अधीक्षक डॉ. भूषण मिरजे, डॉ. अजित लोकरे, डॉ. अक्षय बाफना, नगरसेवक आदिल फरास, विजयसिंह खाडे-पाटील यांच्यासह विभाग प्रमुख उपस्थित होते. डॉ. शुभम हिरेमठ यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. गिरीश कांबळे यांनी आभार मानले.

मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.जॅसमिन यांना सूचना

सीपीआरचा आदर्श घ्या. ग्रामीण भागातील दवाखाने दर्जेदार करा, अशी सूचना मंत्री हसन मुश्रीफ यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन यांना केली.

पालकमंत्री, शल्य चिकित्सकांची अनुपस्थिती

सीपीआर कार्यक्रमाच्या जाहिरातीमध्ये पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचे नाव होते; मात्र फोटो नव्हता. याची चर्चा कार्यक्रमस्थळी होती. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सरिता थोरातदेखील अनुपस्थित होत्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT