कोल्हापूर

जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस बळकट करा : हसन मुश्रीफ

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : वैयक्तिक पातळीवर कोणावरही आरोप, टीका न करता कार्यकर्त्यांनी सर्वसामान्यांची कामे करत राहावीत. येतील त्यांना सोबत घेत संघटितपणे काम करून जिल्ह्यात राष्ट्रवादी बळकट करा, असे आवाहन वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. सीपीआरसह राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांचे रुग्णालय अद्ययावत करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही ते म्हणाले.

मार्केट यार्ड येथील पक्षाच्या कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कार्यकर्त्यांचा मेळावा शनिवारी झाला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्रिपद मिळाल्याबद्दल मुश्रीफ यांचा सत्कार करण्यात आला. मेळाव्यात जिल्ह्यात राष्ट्रवादीचे चार ते पाच आमदार निवडून आणण्याचा निर्धारही करण्यात आला.

राज्याचा विकास आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढीसाठी अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडली. त्यामुळे ते एकाकी पडू नये म्हणून आम्ही सर्वांनी त्यांना पाठिंबा दिला. ईडीच्या भीतीने आपण त्यांना पाठिंबा दिलेला नाही, असे स्पष्ट करून मुश्रीफ म्हणाले, जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे सर्व प्रमुख पदाधिकारी आपल्यासोबत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादी अधिक बळकट करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे.

गोरगरीब, सर्वसामान्यांची सेवा करण्याची संधी म्हणून आपण मंत्रिपदाकडे पाहत आलो आहे. मंत्रिपदाच्या काळात यापूर्वीही आपण गरिबांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. त्याचा लाभ लाखो लोकांना झाला आहे. यावेळी वैद्यकीय शिक्षण खाते मिळाले आहे. त्यामुळे राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांची रुग्णालये अद्ययावत करण्याचा आपला प्रयत्न राहील. दिग्विजय खानविलकर यांच्यामुळे सीपीआरमध्ये वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले. त्यांच्या कार्याच्या प्रेरणेने सीपीआरमध्ये सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. त्यामुळे सीपीआरकडे लोकांचा बघण्याचा द़ृष्टिकोन निश्चित बदलेल, असेही ते म्हणाले.

जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे सर्व प्रमुख कार्यकर्ते मुश्रीफ यांच्या पाठीशी आहेत. येत्या विधानसभा निवडणुकीत चार ते पाच आमदार निवडून आणण्याकरिता कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन आ. राजेश पाटील यांनी केले.

सत्ता नसल्यामुळे कार्यकर्त्यांची कामे होत नसल्याने आपली अवस्था वाईट झाली होती. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी सोडण्याचा निर्णय घेतला. विधानसभेच्या निवडणुकीत किमान निम्मे आमदार निवडून आणत संपूर्ण जिल्हा त्यांच्या पाठीशी उभा आहे हे दाखवून देऊ, असे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी सांगितले. बाबासाहेब पाटील यांनीही जिल्ह्यात राष्ट्रवादीचे चार ते पाच आमदार निवडून आणण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी करावा, असे आवाहन केले.

अनिल साळोखे यांनी स्वागत केले. आदिल फरास यांनी प्रास्ताविक केले. यावेळी राजेश लाटकर, शीतल फराकटे, संभाजी पवार आदींची भाषणे झाली. यावेळी भैया माने, सतीश पाटील, प्रा. किसन चौगले, महेंद्र चव्हाण आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

SCROLL FOR NEXT