कोल्हापूर

पर्यटनस्थळांसाठी 900 कोटींची केंद्र शासनाकडे मागणी

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : पुरातत्त्व विभागाकडील जिल्ह्यातील महत्त्वाच्या पर्यटन स्थळांसाठी 900 कोटी रुपयांची मागणी केंद्र शासनाकडे करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर, जोतिबा मंदिर तसेच रांगणा, पन्हाळा, विशाळगड व पारगड किल्ला आदींचा यामध्ये समावेश असल्याचेही त्यांनी सांगितले. पुरातत्त्व विभागाच्या अधिकार्‍यांसमवेत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी जोतिबा डोंगर ते पन्हाळा रोप-वेच्या सर्वेक्षणाचे आदेशही त्यांनी दिले.

केंद्राकडे असलेल्या व पुरातत्त्व विभागाकडून संवर्धन होत असलेल्या या सर्व ठिकाणांचा संवर्धन आराखडा तयार केला जात आहे. या निधीतून त्या ठिकाणांचे जतन, संवर्धन, दुरुस्ती व परिसर विकासासाठी कामे केली जाणार असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले. पुरातत्त्व विभागाकडून यासाठी वास्तुविशारद यांची नेमणूक करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.

येत्या 4 नोव्हेंबरला पर्यटन विभागाचे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक कोल्हापूर येथे येणार आहेत. ते गोवा येथील असून त्यांची नाळ कोल्हापूरशी जुळलेली असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले. ते आल्यानंतर 900 कोटींच्या कामाबाबत त्यांना सादरीकरण केले जाईल. त्यांनी यापूर्वी तो निधी देणार असल्याचे जाहीर केले होते. यामुळे जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटनाचा विकास होईल व जगाच्या पर्यटनात कोल्हापूर जिल्ह्याचे नाव येईल, असेही मुश्रीफ यांनी सांगितले.

राज्य स्मारकांच्या संवर्धनासाठी 13.52 कोटीला तांत्रिक मान्यता

जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत राज्य संरक्षित स्मारकांची जतन व दुरुस्तीसाठी 13.52 कोटी रुपयांना तांत्रिक मंजुरी देण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. दोन स्मारकांना तांत्रिक मंजुरी दिली असून उर्वरित पाच प्रस्तावांची तांत्रिक मंजुरी येत्या दोन ते तीन दिवसांत मिळणार आहे. पांडवदरा लेणी मसाई पठार 64.79 लाख, महादेव मंदिर मौजे आरे 1.50 कोटी, भुदरगड किल्ला 3.89 कोटी, लक्ष्मी विलास पॅलेस 93 लाख, रांगणा किल्ला 4.28 कोटी आणि विशाळगड व बाजीप्रभू, फुलाजी देशपांडे समाधी गजापूरकरिता 2.28 कोटी अशा 13.52 कोटींच्या कामांचा समावेश असल्याचेही त्यांनी सांगितले.

बैठकीला जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार, सहायक संचालक पुरातत्त्व विभाग, डॉ. विलास वहाणे, पुरातत्त्व विभागाच्या वास्तुविशारद स्मिता कासार-पाटील, वैदही खेबुडकर, प्रियंका दापोलीकर आदी उपस्थित होते.

जोतिबा विकास आराखड्यात रोप-वे चा समावेश

जोतिबा मंदिर डोंगर ते पन्हाळा किल्ला यादरम्यान प्रस्तावित रोप-वेचे सर्वेक्षण करून अंदाजपत्रक सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले. जोतिबा मंदिर विकास आराखड्यात रोप-वेचा समावेश केला जाणार आहे. पन्हाळा ते पावनखिंड या ट्रेकिंग मार्गावर आवश्यक सोयीसुविधा व साईन बोर्ड लावण्याच्याही सूचना त्यांनी केल्या.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT