कोल्हापूर : महानगरपालिकांसह जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगर पंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मार्चपूर्वी घेण्याचे नियोजन आहे. या निवडणुका स्वबळावर लढवून निकालानंतर महायुती म्हणून एकत्र येऊ, असे आ. हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी पत्रकारांशी अनौपचारिक बोलताना सांगितले. ‘गोकुळ’सह जिल्ह्यातील कोणत्याही सहकारी संस्थांच्या सत्तेमध्ये बदल होण्याची शक्यता नसल्याचेही त्यांनी सांगितले.
विधानसभा निवडणूक निकालानंतर मुश्रीफ गुरुवारी कोल्हापुरात शासकीय विश्रामधाम येथे आले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी पुष्पवृष्टी करत त्यांचे स्वागत केले. यामध्ये महिलांची संख्या अधिक होती. यावेळी मुश्रीफ यांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारल्या. ते म्हणाले, या निवडणुकीत आपण विजयी होणार, याचा विश्वास होता. गेल्या तीस वर्षांमध्ये सर्वसामान्य नागरिकांची केलेली सेवा आणि रुग्णांच्या नातेवाइकांना केलेली मदत व ‘लाडकी बहीण’ योजना यामुळेच आपला विजय सुकर झाला.
मुश्रीफ म्हणाले, महानगरपालिका, जिल्हा परिषदांसह राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या काही वर्षांपासून रखडल्याने दुसर्या फळीतील कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे, हे खरे आहे. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुका आता झाल्या असल्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मार्चपूर्वी घेण्याचे नियोजन आहे. मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर याबाबत चर्चा होईल, अशी अपेक्षा आहे.
विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने महायुतीच्या बाजूने स्पष्ट कौल दिला आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थादेखील महायुतीच्या वतीनेच लढविण्यात येतील. परंतु, निवडणूक लढविताना स्वतंत्रपणे लढविल्या जातील आणि निकालानंतर सत्ता स्थापन करताना महायुती म्हणून एकत्र येऊ, असेही मुश्रीफ यांनी सांगितले.