कोल्हापूर

रुग्णसेवा करताना तक्रारी येऊ देऊ नका : हसन मुश्रीफ

Arun Patil

गडहिंग्लज, पुढारी वृत्तसेवा : गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयाकडे आता नव्या विविध सेवासुविधा सुरू झाल्या आहेत. गोरगरीब रुग्णांची सेवा करताना तक्रारी येऊ न देता काम करा. येथील सर्व समस्यांबाबत आरोग्य मंत्र्यांकडे पाठपुरावा करून तातडीने समस्या सोडवू, असे प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. येथील उपजिल्हा रुग्णालयाकडील नव्याने उभारलेल्या 100 बेड फिल्ड हॉस्पिटलच्या प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कृष्णा डायग्नोस्टिकच्या सीटीस्कॅन मशिनाचाही प्रारंभ करण्यात आला.

उपसंचालक दिलीप माने यांनी स्वागत केले. यावेळी आ. राजेश पाटील यांनी, कोरोना काळामध्ये उपजिल्हा रुग्णालयाने चांगली सेवा दिली आहे. कर्मचार्‍यांअभावी सेवेमध्ये अडचणी येत असल्याने त्याची सोडवणूक मुश्रीफ यांनी करावी, अशी मागणी केली.

खा. संजय मंडलिक म्हणाले, केवळ आमदारांच्या मागणीतून हे हॉस्पिटल उभारले नसून, केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा केल्याने याची उभारणी झाली आहे.

पालकमंत्री मुश्रीफ यांनी यावेळी, अपुर्‍या कर्मचार्‍यांसह डॉक्टरांची कमतरता असली तरी आगामी काळात याचा पाठपुरावा करून आरोग्यव्यवस्था चांगली करण्याचे काम करू, असे स्पष्ट केले. यावेळी गडहिंग्लज उपविभागातील विविध पदाधिकारी, आरोग्य विभागांचे कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. स्वाती कमल यांनी, तर आभार जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख यांनी मानले.

नव्या वर्षात आमच्याकडे लक्ष द्या…

यावेळी पालकमंत्री मुश्रीफ यांनी 2023 या वर्षाला निरोप देताना, 'आगामी 2024 हे निवडणुकांचे वर्ष असून, तुम्ही सर्वांनी त्यावेळी आमच्याकडे लक्ष द्या,' असे म्हणताच उपस्थितांंमध्ये जोरदार हशा पिकला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT