कागल : गोकुळ दूध संघामध्ये आम्ही महायुती म्हणून कुणाचा अपमान करण्यासाठी किंवा कुणाचा पराभव करण्यासाठी एकत्र आलेलो नाही. महायुतीच्या रूपाने नियतीनेच आमच्यावर ही जबाबदारी टाकलेली आहे. दूध उत्पादक शेतकर्यांना छप्पर फाडके देणार आहे, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. या निवडणुकीत एकटे पडलो आहोत, असे म्हणत कोणी सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करू नये, असेही ते म्हणाले.
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत जुने मतभेद बाजूला ठेवून महायुतीच्या छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीच्या सर्व २५ उमेदवारांना पॅनेल टू पॅनेल मतदान करून विजयी करा, असे आवाहनही मुश्रीफ यांनी केले. कागल येथे गोकुळ दूध संघाच्या ठरावधारकांचा प्रचार मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, गेल्या पाच वर्षांत विश्वास पाटील, अरुण डोंगळे आणि नवीद मुश्रीफ यांना अध्यक्षपदाची संधी दिली. या काळात म्हशीच्या दुधाच्या दरात प्रतिलिटर १८ रुपये, तर गायीच्या दुधाच्या दरात १२ रुपयांनी वाढ झाली आहे. महायुतीचा जाहीरनामा दोन दिवसांत प्रसिद्ध करण्यात येणार असून, दूध उत्पादकांच्या हितासाठी ठोस उपाययोजना मांडल्या जातील.
प्रा. संजय मंडलिक म्हणाले, उमेदवार निश्चित करताना मोठी कसरत करावी लागली. चांगले पॅनेल झाले आहे. शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित घाटगे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली गोकुळची निवडणूक लढवली जात आहे. मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक व आमदार अमल महाडिक यांनी महायुतीचे पॅनेल घडविण्यासाठी प्रयत्न केले आहेत. शौमिका महाडिक म्हणाल्या, गोकुळच्या प्रगतीत शेतकरी दूध उत्पादकांचे महत्त्वाचे योगदान आहे. ठरावधारकांनी मनात कोणतीही शंका घेऊ नये.
कार्यक्रमास माजी आमदार संजय घाटगे, अरुण डोंगळे, विश्वास पाटील, राहुल पाटील, चेतन नरके, युवराज पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील - आसुर्लेकर, माजी आमदार सुजित मिणचेकर यांच्यासह विकीचे सर्व उमेदवार व ठरावदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हा परिषद सदस्य मनोज फराकटे यांनी स्वागत केले. माजी अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी प्रास्ताविक केले. सौरभ पाटील यांनी आभार मानले.
‘त्या’ जाहीरनाम्याला अर्थ काय आहे?
विरोधकांवर टीका करताना हसन मुश्रीफ म्हणाले, ते आमचे राजकीय मित्र आहेत; मात्र त्यांची राजकीय भूमिका वेगळी आहे. विरोधकांकडून आपण एकटेच लढत असल्याचे सांगून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करू नये. त्यांनी जाहीरनामा प्रसिद्ध केला असून, ‘त्या’ जाहीरनाम्याला अर्थ काय आहे?