मंत्री हसन मुश्रीफ.  (File photo)
कोल्हापूर

मंत्री हसन मुश्रीफ KDCC बँकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार? आजच्या बैठकीकडे जिल्ह्याचे लक्ष

Minister Hasan Mushrif: मुश्रीफ यांनी सांगलीत केलेले वक्तव्य हे केवळ राजकीय ‘गुगली’ होती, की ते खरोखरच राजीनामा देणार आहेत, याचे उत्तर आजच्या बैठकीनंतरच मिळणार आहे

पुढारी वृत्तसेवा

Kolhapur District Central Cooperative Bank Update

गुडाळ : कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (KDCC) अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचे सूतोवाच केल्यानंतर, आज (दि.२८) होणाऱ्या बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीकडे संपूर्ण जिल्ह्याच्या सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे. या बैठकीत मुश्रीफ आपल्या भूमिकेवर ठाम राहणार का, आणि संचालक मंडळ काय निर्णय घेणार, यावर बँकेच्या भविष्यातील नेतृत्वाची दिशा ठरणार आहे.

राजीनाम्याच्या घोषणेमागे नेमके कारण काय?

मागील आठवड्यात सांगलीतील एका कार्यक्रमात बोलताना, मंत्री हसन मुश्रीफ यांनी आपल्या एकाच घरात मंत्रीपद, 'गोकुळ' आणि 'केडीसीसी बँक' यांसारख्या प्रमुख संस्थांची अध्यक्षपदे असणे योग्य नसल्याचे मत व्यक्त केले होते. मंत्रीपदाच्या व्यस्ततेमुळे बँकेच्या कामकाजाला पूर्ण वेळ देता येत नाही, त्यामुळे बँकेला पूर्णवेळ अध्यक्ष मिळावा या हेतूने आपण राजीनामा देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.

दहा वर्षांची यशस्वी कारकीर्द

सन २०१५ मध्ये बँकेवरील प्रशासकीय राजवट संपल्यानंतर झालेल्या निवडणुकीत हसन मुश्रीफ अध्यक्षपदी विराजमान झाले. तेव्हापासून गेली दहा वर्षे त्यांनी अध्यक्षपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली आहे. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी नियोजनबद्ध आणि काटकसरीचा कारभार करून बँकेला पुन्हा गतवैभव प्राप्त करून दिले. विशेष म्हणजे, या दहा वर्षांत त्यांनी बँकेची गाडी वापरली नाही आणि संचालकांच्या अवांतर खर्चावरही मोठे नियंत्रण आणले, ज्यामुळे बँकेची आर्थिक शिस्त सुधारली.

नवा अध्यक्ष कोण? राजकीय गणितं काय?

जर मुश्रीफ यांनी राजीनामा दिला, तर सप्टेंबरमध्ये होणाऱ्या बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर उर्वरित सव्वा वर्षाच्या कालावधीसाठी नव्या अध्यक्षाची निवड केली जाईल. बँकेत लवकरच मोठी नोकरभरती होणार आहे, तसेच आगामी वर्ष निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे असल्याने, अध्यक्षपद आपल्याच खास मर्जीतील संचालकाला मिळावे, यासाठी मुश्रीफ प्रयत्नशील राहण्याची दाट शक्यता आहे. एकंदरीत, मुश्रीफ यांनी सांगलीत केलेले वक्तव्य हे केवळ राजकीय ‘गुगली’ होती, की ते खरोखरच राजीनामा देणार आहेत, याचे उत्तर आजच्या बैठकीनंतरच मिळणार आहे. त्यामुळे या बैठकीतील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT