मंत्री हसन मुश्रीफ (File photo)
कोल्हापूर

Hasan Mushrif | महापालिकेत राष्‍ट्रवादीला जमेत धरत नाहीत, ठीक आहे

मंत्री हसन मुश्रीफ यांचा गर्भित इशारा; भाजप-शिवसेनेत गोंधळ, आम्‍हाला पदाची अपेक्षा नसल्‍याचे केले स्‍पष्‍ट

पुढारी वृत्तसेवा

कोल्‍हापूर : कोल्‍हापूर महापालिकेत महापौर निवडीवरून भाजप, शिवसेनेत गोंधळ आहे. आमचे संख्‍याबळ कमी असल्‍याने महापालिकेत राष्‍ट्रवादीला जमेत धरले जात नाही, ठीक आहे, असा गर्भित इशारा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला. तसेच राष्‍ट्रवादीची संख्‍या निर्णायक असली, तरी आम्‍ही महायुती म्‍हणून भाजप, शिवसेनेसोबतच राहणार असल्‍याचेही मुश्रीफ यांनी स्‍पष्‍ट केले. तसेच यावेळी त्‍यांनी डिलिमिटेशनवरून काँग्रेसची भूमिका आणि विजय वडेट्टिवार यांचे वक्‍तव्‍य निषेधार्ह असल्‍याचे सांगितले.

राष्‍ट्रवादीच्‍या दुष्‍काळ आढावा बैठकीनंतर मंत्री मुश्रीफ यांनी प्रसार माध्‍यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, यावेळी त्‍यांनी एकीकडे आ. राजेश क्षीरसागर महापौरपद दहा महिन्‍यांचे असेल असे सांगतात, तर खा. धनंजय महाडिक सव्‍व वर्षासाठी पद असल्‍याचे सांगत आहेत. महापौरांनी नेत्‍यांनी सांगितल्‍याशिवाय राजीनामा देणार नसल्‍याची भूमिका घेतली आहे. यावरून गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. राष्‍ट्रवादीची संख्‍या कमी असल्‍याने आम्‍हाला ते जमेत धरत नाहीत; पण ठीक आहे. आम्‍हाला पदाची अपेक्षा नाही. ज्‍येष्‍ठ नेते शरद पवार यांचा नेहमीच चांगल्‍या गोष्‍टींना पाठिंबा असतो. आता त्‍यांनी आणि खा. सुप्रिया सुळे यांनी डिलिमिटेशनला पाठिंबा देण्‍याची घेतलेली भूमिका स्‍वागतार्ह आहे. त्‍यांच्‍यावर टीका करणारे वडेट्टिवार यांचे वक्‍तव्‍य निषेधार्ह असल्‍याची टीका मंत्री मुश्रीफ यांनी केली.

काँगेसची भूमिका विरोधाला विरोध

डिलिमिटेशनवरून काँग्रेसची भूमिका विरोधाला विरोध अशी आहे. केंद्र सरकारच्‍या या निर्णयामुळे लोकसंख्‍या नियंत्रणात ठेवलेल्‍या राज्‍यांना न्‍याय मिळणार आहे. तसेच महिलांना ३३ टक्‍के आरक्षण मिळणार असल्‍याने त्‍यांचा राजकीय सहभाग वाढेल; पण काँग्रेसला महिलांना आमदार, खासदार होऊच द्यायचे नाही, असा आरोप मंत्री मुश्रीफ यांनी केला.

...तर सतेज पाटलांनी राहुल गांधींना सांगावे..

डिलिमिटेशनला सगळ्यांनी पाठींबा द्यावा. याबाबत सतेज पाटलांना सांगता आलं, तर त्‍यांनी पाठिंब्‍याबाबत काँग्रेस नेते राहुल गांधींना सांगावं, असा खोचक टोला मुश्रीफ यांनी आ. सतेज पाटील यांना लगावला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT