कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : मंत्री म्हणून शपथ घेतलेल्या हसन मुश्रीफ यांच्याकडे कोल्हापूरच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी येण्याची शक्यता आहे. विद्यमान पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या कारभाराविरोधात स्थानिक भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते नाराज असल्याची चर्चा आहे. त्यात जिल्ह्यातून निवडून आलेल्या आमदाराला मंत्रिपद देण्याच्या नैसर्गिक न्याय तत्त्वानुसार पालकमंत्रिपद मुश्रीफ यांच्याकडे येईल अशी परिस्थिती आहे.
महाविकास आघाडीच्या काळात पालकमंत्री पदाची धुरा काँग्रेसचे सतेज पाटील यांनी सांभाळली. सत्ताबदलानंतर जिल्ह्यातून निवडून आलेल्या एकाचीही मंत्रिमंडळात वर्णी लागली नाही. यामुळे दीपक केसरकर यांच्याकडे कोल्हापूरच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. मात्र, केसरकर यांच्या कोल्हापूरचे पालकमंत्री म्हणून सुरू असलेल्या कारभाराविरोधात स्थानिक भाजपमध्ये नाराजीचा सूर आहे.
पालकमंत्री भाजपसाठी वेळ देत नाहीत. भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या कामांना डावलले जाते. अनेक कार्यक्रमांत योग्य सन्मान राखला जात नाही. याचा परिणाम पक्षवाढीवर होत असल्याच्या तक्रारी भाजपने थेट राज्य नेतृत्वाकडेही केल्या होत्या. तुमच्या विरोधातच आंदोलन करू, असाही इशारा भाजप पदाधिकार्यांनी पालकमंत्र्यांना विश्रामगृहावर दिला होता. विशेष कार्यकारी अधिकार्यांच्या नियुक्त्यांबाबत जिल्हा प्रशासनाला निवेदन देताना त्यात भाजपने पालकमंत्र्यांच्या कारभारावर निशाना साधत पालकमंत्री की पर्यटनमंत्री अशी टीका केली होती. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री बदलण्याचीच शक्यता असून ती माळ मुश्रीफ यांच्याच गळ्यात पडेल, असाही अंदाज आहे.
जिल्ह्यात सत्ताबदलानंतर अनेकांना मंत्रिपदाचे वेध लागले होते. शिवसेनेचे जिल्ह्यातील एकमेव आमदार म्हणून प्रकाश आबिटकर यांनी मंत्रिपदावर दावा सांगितला होता. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून काम पाहिलेल्या राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनीही उठावात सहभागी होत शिंदे गटातून आपली दावेदारी कायम ठेवली होती. भाजपचे मित्र पक्ष म्हणून जनसुराज्य शक्तीचे आमदार विनय कोरे आणि अपक्ष प्रकाश आवाडे यांच्याही नावाची चर्चा होती. आ. कोरे यांची भाजपशी वाढती जवळीक, त्यांचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी तसेच राष्ट्रीय पातळीवर भाजपशी असलेले संबध, यामुळे त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल आणि पालकमंत्रिपदाची जबाबदारी त्यांना मिळेल, अशी चर्चा सातत्याने सुरू होती. मात्र, रविवारच्या सत्तानाट्यानंतर या सर्व चर्चा आता आणि इच्छुकांच्या आशा धूसर होऊ लागल्या आहेत.