कोल्हापूर जिल्हा बँक 
कोल्हापूर

जिल्हा बँकेत सबकुछ हसन मुश्रीफ

विधानसभा निवडणुकीमुळे बदललेल्या राजकारणाचा बँकेवर परिणाम नाही

पुढारी वृत्तसेवा
चंद्रशेखर माताडे

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याच्या आर्थिक नाड्या हातात ठेवण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत खासदार,आमदारच संचालक म्हणून निवडून येतात. या बँकेची सर्व सूत्रे हसन मुश्रीफ यांच्या नजरेच्या इशार्‍यावर हालतात. विधानसभा निवडणुकीत जिल्ह्याच्या राजकारणात बदल झालेला असला तरी जिल्हा बँकेतील राजकारणात कोणताही बदल होण्याची सूतराम शक्यता नाही. उलट जिल्हा बँकेत महायुती भक्कम झाली आहे. विरोधी आघाडीतून आलेले तीन सदस्य आता महायुतीचे घटक बनल्याने जिल्हा बँकेत महायुती भक्कम झाली आहे.

जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक जानेवारी 2022 ला झाली. खरे तर याच निवडणुकीत जिल्ह्यात कागदावर नसले तरी प्रत्यक्षात महायुती आकाराला आली होती. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि जनसुराज्य शक्ती अशा आघाडीने 21 पैकी 18 जागा जिंकल्या तेव्हा हसन मुश्रीफ यांच्या एकतफीर्र् कारभाराला तत्कालीन खासदार संजय मंडलिक, आ. प्रकाश आबिटकर व बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांनी आव्हान दिले होते. मंडलिक यांनी तर अदानी अंबानी यांच्या तावडीतून बँक वाचविण्यासाठी विरोधी पॅनेल उभे केल्याची जाहीरपणे सांगितले होते. मात्र स्वत: मंडलिक आ. प्रकाश आबिटकर यांचे बंधू अर्जुन आबिटकर आणि बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर हे तिघेच निवडून आले. तेव्हा वेळ मिळाला असता तर आम्ही आणखी यश मिळवून किंगमेकर झालो असतो, अशी प्रतिक्रिया मंडलिक यांनी दिली होती.

पी. एन. पाटील यांच्या निधनामुळे त्यांचे चिरंजीव राजेश पाटील यांना संधी देण्यात आली आहे. आता या संचालक मंडळात विरोधात म्हणायचे तर सतेज पाटील, राजेश पाटील, राजू आवळे, सुधीर देसाई, रणजित पाटील, स्मिता गवळी, श्रुतिका काटकर अशी नावे घेता येतील. मात्र सहकारात पक्ष नसतो असे म्हणत नेत्यांची सोयीची भूमिका आणि विरोधी पॅनेलमधून निवडून आलेले संचालकही महायुती म्हणून एकत्र असल्याने महायुतीचे बळ वाढले आहे. राज्याच्या व जिल्ह्याच्या राजकारणात बदल झाले असले तरी जिल्हा बँकेत बदलाची शक्यता धूसर आहे. अध्यक्षपदाच्या निवडीवेळी पुढचे राजकारण कसे आकाराला येणार हे स्पष्ट होईल. तोपर्यंत तरी केडीसीसीमध्ये सबकुछ मुश्रीफ अशीच परिस्थिती असणार आहे.

चिठ्ठीत वर्तविलेले खरे ठरले

हसन मुश्रीफ यांच्यासह सतेज पाटील, पी. एन. पाटील, विनय कोरे, राजेश पाटील, राजेंद्र पाटील-यड्रावकर, राजू आवळे, निवेदिता माने, अमल महाडिक, ए. वाय. पाटील, भैया माने, संतोष पाटील, रणजित पाटील, सुधीर देसाई, विजयसिंह माने, रणवीरसिंह गायकवाड, श्रुतिका काटकर व स्मिता गवळी हे सत्ताधारी विजयी झाले होते. त्यावेळी ‘साहेब तुम्ही भाजपसोबत कसे?’ अशी एक निनावी चिठ्ठी मतपेटीत सापडली होती. त्या चिठ्ठीत जे म्हंटले होते, ते आता बदलत्या राजकाणाने खरे ठरविले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT