Gokul Election | मी गोकुळची निवडणूक लढवणार नाही : मंत्री हसन मुश्रीफ यांची स्पष्टोक्ती 
कोल्हापूर

Gokul Election | मी गोकुळची निवडणूक लढवणार नाही : मंत्री हसन मुश्रीफ यांची स्पष्टोक्ती

कागल येथील कार्यक्रमात दिली माहिती

पुढारी वृत्तसेवा

कागल : आजच्या एका वर्तमानपत्रांमध्ये मी गोकुळ दूध संघाची निवडणूक लढवून गोकुळ दूध संघाचा अध्यक्ष होणार, अशी बातमी आलेली आहे. परंतु; मी गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी उभा राहणार नाही, अशी स्पष्टोक्ती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. सध्या गोकुळच्या राजकारणाने जिल्ह्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. आरोप - प्रत्‍यारोप, प्रशासक- संस्थाचे ठराव यावरुन सध्या आरोप प्रत्‍यारोप सुरु आहेत. त्‍यामुळे मुश्रीफ हे स्वतः निवडणूकीला उभारणार असल्यसाने चर्चेला उधाण आले होते. पण आज त्‍यांनी यावर पडदा टाकत आपण गोकुळ निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार देवेंद् फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जनसेवा सप्ताह अंतर्गत आयोजित कागल विधानसभा मतदारसंघातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना किट वाटप, शिष्यवृत्ती मंजुरी पत्रे वाटप, घरकुल मंजुरीपत्रे वाटप अशा संयुक्त कार्यक्रमात मुश्रीफ बोलत होते. शाहू समूहाचे प्रमुख समरजितसिंह घाटगे यांची प्रमुख उपस्थित होती.

भाषणात मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले, बांधकाम कामगार समितीने बांधकाम कामगारांचे नूतनीकरण दरवर्षी होईल यासाठी सजग राहिले पाहिजे. आपण वर्षाला नूतनीकरण केले नाही तर त्याचा लाभ मिळत नाही. नोंदणीसाठी व नूतनीकरणासाठी त्यांच्या मोबाईलवर कसा मेसेज जाईल, त्याला कसा समजेल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. तरच समितीचे काम शंभर टक्के यशस्वी होईल. आम्हा सर्वांचीच अपेक्षा असते की, सर्व लाभ घेऊन बांधकाम कामगारांचे राहणीमान, जीवनमान उंचावले पाहिजे. त्यांची मुले दर्जेदार व गुणवत्त शिक्षण घेऊन डॉक्टर्स, इंजिनियर्स, आयएएस, आयपीएस बनली पाहिजेत.

शाहू सहकार समूहाचे अध्यक्ष समरजीतसिंह घाटगे म्हणाले, संजय गांधी निराधार योजना समिती व बांधकाम कामगार समिती या योजनांचे लाभार्थी करण्यामध्ये कागल तालुका जिल्हासह राज्यात आघाडीवर आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT