कोल्हापूर : शरद पवार यांनी ‘त्या’ व्यक्तींची नावे, पत्ते, फोन नंबर तरी लिहून ठेवले असतीलच, हे कसे करून देणार आहात, हे त्यांनी त्यांना विचारायला हवे होते. त्यांनी प्रयोग करायला पाहिजे होता, अशी उपरोधिक टीका वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी केली. ‘शक्तिपीठ’ करायचा आहे. परंतु, तो कोणावरही लादायचा नाही, हीच मुख्यमंत्र्यांची भूमिका असल्याचेही त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी बोलताना मुश्रीफ म्हणाले, 160 जागा निवडून देतो म्हणून दोन व्यक्ती भेटल्याचा गौप्यस्फोट शरद पवार यांनी केला होता. त्यावर विधानसभा निवडणुका होऊन आता नऊ महिने होऊन गेले आणि पवार ही गुगली टाकत आहेत. अशा कपोलकल्पित गोष्टी सांगून लोकांचे फक्त मनोरंजनच होईल, असा टोलाही त्यांनी लगावला. राहुल गांधी विनाकारण निवडणूक आयोगाचा, देशाचा आणि संसदेचाही वेळ घेत आहेत. त्यांच्या आरोपातून काहीही साध्य होणार नाही. बिहारच्या निवडणुकीसाठी त्यांचा हा काहीतरी प्लॅन असू शकतो, असे सांगत जिल्ह्यात एकही उमेदवार असे झालेले आहे, असे म्हणायला तयार नाही, असेही मुश्रीफ म्हणाले.
‘शक्तिपीठ’साठी मुख्यमंत्र्यांनी आम्हाला अनेक मार्ग सुचविलेले आहेत. त्यापैकी जो मार्ग चांगला असेल, कमीत कमी बागायती जमीन जाईल व जिथे शेतकरी समाधानी असेल त्या ठिकाणाहून शक्तिपीठ रस्ता नेण्याची भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली असल्याचेही त्यांनी सांगितले. कलंकित मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढून टाका, यासाठी राज्यात सोमवारी झालेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या आंदोलनावर मुश्रीफ म्हणाले, आरोप सिद्ध व्हावे लागतात, ते न होता कारवाई कशी होईल. वातावरण ढवळणे आणि सत्तारूढ पक्षावर टीका करणे हे विरोधी पक्षाचे काम आहे.
सर्किट बेंच तयारीची पाहणी करायला मी जाणार नाही. उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाची कार्यक्रम आचारसंहिता वेगळी असते. न्यायाधीशांनी कार्यक्रमाबाबत जे ठरवलेले असेल त्यामध्ये हस्तक्षेप आम्ही करणार नाही असे सांगत, ज्यावेळी जिल्हा न्यायालय बांधले त्यावेळी तत्कालीन उच्च न्यायाधीशांनी बोलावून या इमारतीचा सर्वोत्कृष्ट प्लॅन केलेला आहे, असे सांगितले होते. आता तो टाईप प्लॅन म्हणून सर्व राज्यभर राबविला जात आहे, असेही ते म्हणाले.
सर्किट बेंचची लढाई सहा जिल्ह्यांतील जनतेने आणि वकिलांनी जिंकलेली आहे. या लढाईत दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांचा मोठा वाटा आहे. सर्किट बेंचमुळे कोल्हापूरच्या विकासामध्ये 20 टक्के वाढ होईल. कोल्हापूरची हद्दवाढसुद्धा होईल. एकूणच कोल्हापूरच्या विकासाचे महाद्वार खुले झाल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.
शक्तिपीठ महामार्गाच्या प्रस्तावित खर्चाचा आकडा वाढविलेला आहे, या आ. सतेज पाटील यांच्या वक्तव्याबाबत बोलताना मुश्रीफ म्हणाले, ते नवीनच आर्किटेक्ट झालेले आहेत. त्यांचे ज्ञान इतके प्रगल्भ झाले आहे, हे मला माहीत नव्हते. रस्ता किती किलोमीटरचा, तो काँक्रिटीकरणाचा की कसा? यावर दर ठरतात, असेही त्यांनी सांगितले.