मंत्री हसन मुश्रीफ (File photo)
कोल्हापूर

Hasan Mushrif | गोकुळचा विषय संपला; सतेज पाटलांशी अधिवेशनात बोलणार

मंत्री मुश्रीफ यांची भूमिका; न्यायालयाचा निर्णय मान्य करणार

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : गोकुळ दूध संघाचा विषय आता संपवला पाहिजे. न्यायालय जो काही निर्णय देईल, तो आम्हाला मान्य असेल. संघ चांगल्या पद्धतीने आणि एकमताने कसा चालविता येईल, यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. आमदार सतेज पाटील हिवाळी अधिवेशनात भेटले, तर त्यांच्याशी याबाबत चर्चा करणार असल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी मंगळवारी स्पष्ट केले.

कागल येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री मुश्रीफ यांनी, गोकुळमध्ये समविचारीचा अध्यक्ष होऊ शकला नाही याची खंत आ. सतेज पाटील यांच्या मनात असावी. मात्र, आता हा विषय पुढे न ताणता न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा करावी. गोकुळ पुन्हा नावारूपाला आणण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज असल्याचे सांगितले. संघाला मोठ्या प्रमाणात ताज्या दुधाची आवश्यकता असून, त्याच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

त्यांची भूमिका स्वागतार्ह

मतदारसंघ पुनर्रचनेला खासदार सुप्रिया सुळे आणि द्रमुकने घेतलेली भूमिका स्वागतार्ह आहे. मतदारसंघातील मतदार संख्या कमी झाल्यास लोकप्रतिनिधींना अधिक प्रभावीपणे काम करता येईल, असे मुश्रीफ यांनी सांगितले.

आ. रोहित पवार राजकीय स्पेस निर्माण करत आहेत

आमदार रोहित पवार पक्षाला विश्वासात न घेता आंदोलने करीत असल्याची भावना त्यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये आहे. मात्र, हा त्यांचा पक्षांतर्गत मामला असल्याने त्यावर अधिक बोलणे उचित नसल्याचे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. रोहित पवार आक्रमकपणे काम करून स्वतःसाठी राजकीय स्पेस निर्माण करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

.. तर प. महाराष्ट्राचे पाणी इतरत्र वळवू देणार नाही

कोयना धरणातील वीजनिर्मितीनंतर वशिष्ठी नदीतून समुद्राला वाहून जाणारे पाणी मुंबईला पिण्यासाठी नेण्यास विरोध करण्याची गरज नाही. मात्र, वारणा धरणासारख्या धरणांतील पश्चिम महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी इतरत्र वळवू देणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. मराठवाड्याचा दुष्काळ दूर करण्यासाठी पुराचे वाहून जाणारे पाणी मराठवाडा ग्रीडच्या माध्यमातून देण्याचा शासनाचा विचार असल्याचेही त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT