Zilla Parishad election | हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांनी मारले जि.प.चे मैदान 
कोल्हापूर

Zilla Parishad election | हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांनी मारले जि.प.चे मैदान

जिल्ह्याच्या मिनी मंत्रालयावर महायुतीचाच झेंडा; काँग्रेस सत्तेबाहेर

पुढारी वृत्तसेवा

चंद्रशेखर माताडे

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेवर महायुतीचा झेंडा फडकणार हे स्पष्ट झाले आहे. निवडणूकपूर्व युती झाली नसली, तरी नेत्यांनी यापूर्वीच निकालानंतर एकत्र येऊ, असे सांगितल्याने महायुतीचा अध्यक्ष होणार हे स्पष्ट आहे. काँग्रेसने दमदार कामगिरी केली असून, 15 जागांवर यश मिळविले आहे; मात्र काँग्रेस सत्तेबाहेर असून, सर्वाधिक 18 जागा जिंकून राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्ह्यात मुसंडी मारली आहे. ‘गोकुळ’ आणि जिल्हा बँकेच्या निवडणुकीपूर्वी या दोन्ही संस्था ताब्यात असलेल्या हसन मुश्रीफ यांनी पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध केले आहे.

अटीतटीने लढलेल्या या निवडणुकीत युती आणि आघाडी न होता स्थानिक पातळीवर तडजोडी झाल्या होत्या. ऐनवेळी नेत्यांनी केलेले पक्षांतर, तसेच कार्यकर्त्यांच्या इकडून तिकडे जाण्याने राजकारणाला कलाटणी मिळणार, हे स्पष्ट होते. अजित पवार यांच्या अकाली निधनाने जिल्ह्यात प्रचार सभांतून तोफा गरजल्याच नाहीत. केवळ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभा घेतल्या. अन्य पक्षांच्या नेत्यांच्या सभा झाल्याच नाहीत. संपूर्ण निवडणूक यंत्रणा कार्यकर्त्यांनी हाताळली.

करवीरमध्ये काँग्रेसला सर्वाधिक जागा

करवीरमध्ये काँग्रेसने वर्चस्व ठेवले आहे. सर्वाधिक पाच जागा काँग्रेसने जिंकल्या आहेत. राष्ट्रवादी तीन, भाजप तीन व शिवसेनेला एक जागा मिळाली आहे. करवीर मतदारसंघात भाजप व शिवसेनेचे आमदार आहेत. त्या तुलनेत काँग्रेसने एकहाती मिळवलेले यश हे उल्लेखनीय आहे. महायुती म्हणून तालुक्यात त्यांनी वर्चस्व ठेवले आहे. सतेज पाटील, चंद्रदीप नरके, धनंजय महाडिक, अमल महाडिक, राहुल पाटील-सडोलीकर यांच्यासह अन्य नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. एकूण 12 जागांपैकी महायुतीला 7 जागा मिळाल्या आहेत. 5 जागा काँग्रेसने जिंकल्या आहेत. शिवसेनेचे आमदार असूनही त्यांना एकमेव जागा मिळाली, तर राष्ट्रवादीचे आमदार नसतानाही त्यांनी तीन जागा मिळविल्या आहेत. अमल महाडिक यांनी भाजपला तीन जागा मिळवून दिल्या आहेत.

कोल्हापूर दक्षिणमध्ये काँग्रेस, भाजपला प्रत्येकी तीन जागा

कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात काँग्रेस व भाजप यांच्यात अटीतटीची लढत होती. ऋतुराज पाटील आणि अमल महाडिक यांच्या या रणभूमीवर मतदारांनी दोन्ही पक्षांना तीन-तीन अशा समान जागा दिल्याने आगामी विधानसभा निवडणुकीची चुरस वाढणार आहे.

कागलला मुश्रीफ व दोन्ही घाटगे यांना यश; मंडलिक गटाचा धुव्वा

जिल्ह्याच्या राजकीय विद्यापीठाने हसन मुश्रीफ, समरजित घाटगे व संजय घाटगे यांच्या गळ्यात विजयाची माळ घातली आहे. संजय मंडलिक गटाचा धुव्वा उडाला असून, त्यांना पंचायत समितीत फक्त एका जागेवर यश मिळाले आहे. तीन गट विरुद्ध एक गट अशा लढतीत तीन गट भारी पडले आहेत. एकूण सहा जागांपैकी मुश्रीफ यांना तीन, संजय घाटगे यांना दोन, तर समरजित घाटगे यांना एक जागा मिळाली आहे.

शिरोळमध्ये यड्रावकरांना यश

शिरोळ तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 7 जागांपैकी राजर्षी शाहू आघाडीला चार, भाजप, स्वाभिमानी व काँग्रेसला प्रत्येकी एक जागा मिळाली असून, आ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू विकास आघाडीने यश मिळविले आहे. तालुक्याचे राजकीय समीकरण बदलणारी निवडणूक असल्याने तेथे यड्रावकर यांच्याबरोबरच माधवराव घाटगे, सावकार मादनाईक, राजवर्धन नाईक-निंबाळकर, सतेज पाटील, राजू शेट्टी, गणपतराव पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.

चंदगडला आमदारांना धक्का

चंदगडला हसन मुश्रीफ यांनी दोन्ही राष्ट्रवादींचे नेते राजेश पाटील, नंदाताई बाभुळकर यांना एका व्यासपीठावर आणल्याचे फळ त्यांना जनतेने दिले आहे. चारपैकी केवळ एका जागेवर भाजपचे आमदार शिवाजी पाटील यांना यश मिळाले आहे. उर्वरित तीन जागा राष्ट्रवादीला मिळाल्या असून माजी मंत्री भरमू सुबराव पाटील यांच्या स्नुषा ज्योती पाटील यांचा पराभव झाला आहे. येथे गोपाळराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने पहिल्यांदाच चिन्हावर निवडणूक लढविली होती.

आजर्‍यात राष्ट्रवादी सुसाट

आजरा तालुक्यात राष्ट्रवादीने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. तालुक्यातील दोन्ही जागा राष्ट्रवादीने जिंकल्या आहेत. येथील निकाल हा स्थानिक आमदारांना व नेत्यांना विचारमंथन करायला लावणारा आहे.

गडहिंग्लजला राष्ट्रवादीच भाजपची जबर पिछेहाट

जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकणार अशी घोषणा करणारे भाजपा आमदार शिवाजी पाटील यांना धक्का बसला आहे. त्यामुळे भाजप बॅकफूटवर गेली आहे. हसन मुश्रीफ यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांना एकत्र आणल्याचा फायदा त्यांना झाला असून चारही जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीला यश मिळाले आहे.

शाहूवाडीत दोन्ही आघाड्यांना समसमान संधी

शाहूवाडी तालुक्यातील चार जिल्हा परिषद मतदारसंघात दोन जागा सरुडकर-गायकवाड गटाला तर दोन जागा जनसुराज्य-काँग्रेस आघाडीला मिळाल्या आहेत. बांबवडेत गायकवाड गटाला यश मिळाले असून माजी खासदार उदयसिंगराव गायकवाड यांची नातसून राजकुंवर यांनी बाजी मारली आहे तर सरुडकर यांनी बालेकिल्ला राखला आहे.

गगनबावड्यात काँग्रेसच

गगनबावडा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या दोन्ही जागांवर काँग्रेसने यश मिळविले असून सतेज पाटील यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याचे मनसुबे उधळले गेले आहेत. या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या विरोधात आमदार चंद्रदीप नरके व भाजपचे पी. जी. शिंदे यांनी मोर्चेबांधणी केली होती. मात्र त्यांना यश आले नाही. सोनाली पाटील या सर्वात तरुण उमेदवाराला जनतेने जिल्हा परिषदेच्या सभागृहात पाठविले आहे.

पन्हाळ्यात कोरे यांची एकहाती सत्ता संपली

पन्हाळ्याच्या राजकारणात जनसुराज्य शक्ती पक्षाच्या माध्यमातून आमदार विनय कोरे यांनी आपले वर्चस्व कायम ठेवले होते. मात्र त्यांच्या वर्चस्वाला आमदार चंद्रदीप नरके व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर यांनी सुरुंग लावला आहे. जिल्हा परिषदेच्या सहा जागांपैकी केवळ एक जागा राखण्यात यश आले असून राष्ट्रवादीने जिल्हा परिषदेच्या तीन जागांवर यश मिळविले आहे. जनसुराज्यमधील अंतर्गत धुसफुसीचा फटका कोरे यांना बसला आहे. शिवसेनेने जनसुराज्यची रसद कापून त्यांना मर्यादित केले आहे.

राधानगरीत पालकमंत्र्यांना फटका

राधानगरी व भुदरगड असा पालकमंत्री प्रकाश आबीटकर यांचा संयुक्त मतदारसंघ आहे. मात्र यापैकी राधानगरी तालुका आबिटकर यांच्या हातातून निसटला आहे. केवळ एका जागेवर त्यांना यश मिळाले असून तिथे जिल्हा परिषदेच्या पाच पैकी तीन जागांवर काँग्रेसने तिरंगा फडकविला आहे. एक जागा राष्ट्रवादीला मिळाली आहे. या तालुक्यात डोंगळे घराण्यात नणंद-भावजय लढत झाली होती. यामध्ये नणंद विजयी झाली आहे. अभिजित तायशेटे यांनी निसटता विजय मिळविला आहे. पंचायत समितीवर काँग्रेसची एकहाती सत्ता येणार आहे.

भुदरगड आबिटकरांचाच

पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आपल्या भुदरगड तालुक्यात आपली सत्ता कायम राखली आहे. जि.प.च्या चारपैकी तीन जागांवर आबिटकर यांना यश मिळाले असून, त्यांच्या भावजय रोहिणी आबिटकर निवडून आल्या आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीने येथे मजबूत आघाडी केली होती. मात्र, त्यांना केवळ एका जागेवरच समाधान मानावे लागले आहे.

‘गोकुळ’च्या संचालकांचे यश-अपयश

राधानगरीमध्ये ‘गोकुळ’चे अभिजित तायशेटे व अरुण डोंगळे यांची कन्या अमृता डोंगळे, दिवंगत संचालक राजेंद्र मोरे यांच्या स्नुषा संयोगिता मोरे या विजयी झाल्या आहेत. पाडळी खुर्द मतदारसंघातून विश्वास पाटील यांचे चिरंजीव सचिन पाटील यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. संचालक अमर पाटील विजय झाले आहेत.

हातकणंगलेत महायुतीच

हातकणंगले तालुक्यात भाजपने चार, शिवसेनेने तीन, काँग्रेसने तीन व जनसुराज्यने एका जागेवर यश मिळविले आहे. या तालुक्यातील कोरोची येथून आ. राहुल आवाडे यांच्या कन्या सानिका आवाडे या राज्यात सर्वाधिक मतांनी निवडून आल्या आहेत. तालुक्यावर भाजप-शिवसेनेने आपले वर्चस्व ठेवले असून, अशोकराव माने जनसुराज्य शक्ती पक्षाचे आमदार असूनही त्यांची तिथे पीछेहाट झाली आहे. हातकणंगले पंचायत समितीवर, तसेच इचलकरंजी महापालिका, हुपरी नगरपालिका एकहाती सत्ता मिळवून आवाडे यांनी आपले वर्चस्व अबाधित ठेवले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT