कागल : आमदार शिवाजी पाटील यांनी माझी व्यक्तिगत बदनामी करत नोटबंदीमध्ये मी नोटा बदलल्याचा त्यांचा आरोप होता. त्यांनी आरोपांचे पुरावे द्यावेत, अन्यथा फौजदारी बदनामीचा दावा दाखल करू, असा इशारा मी दिला. तरीसुद्धा त्यांनी टीका सुरूच ठेवली आहे. पुराव्यासाठी त्यांना मुदत दिली होती. आता ती संपली असून याबाबत कायदेतज्ज्ञाशी सल्ला घेऊन निर्णय घेणार असल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी कागल येथील पत्रकार परिषदेत सांगितले.
कर्जमाफीबाबत ना. मुश्रीफ म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी काल 30 जूनपूर्वी कर्जमाफीचा निर्णय होईल, असे जाहीर केले आहे. याला आचारसंहितेचा अडथळा येणार नाही. 30 सप्टेंबर 2025 अखेर दोन लाखांपर्यंतचे थकीत कर्ज माफ करण्यात येणार आहे आणि 30 सप्टेंबर 2025 अखेर नियमित कर्जफेड करणार्यांना 50 हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे.
‘गोकुळ’च्या निवडणुकीला महायुती म्हणूनच सामोरे जाऊ, असा विश्वासही मुश्रीफ यांनी देत जागावाटप मुख्यमंत्रीच ठरवतील, असेही त्यांनी सांगितले.
समाजमाध्यमांवर कॉक्रोच जनता पार्टीला मिळत असलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल मंत्री मुश्रीफ म्हणाले, बेरोजगार तरुणांमधील नाराजीचा मुद्दा घेऊन याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे, ही वस्तुस्थिती असली तरी मुख्यमंत्री फडणवीस हुशार, दूरदृष्टीचे आहेत. ते तरुणाईमधील नाराजी आणि खदखद दूर करतील.