Harshvardhan Sapkale Criticism Gokul President Navid Mushrif
नवी दिल्ली : कोल्हापूर दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ)अध्यक्षपदी नविद मुश्रीफ यांची करण्यात आलेली निवड म्हणजे हुकुमशाही आणि ठोकशाही आहे, अशी खरमरीत टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादक संघ गोकुळच्या अध्यक्षपदाची निवड प्रतिष्ठेची झाली होती. यामध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांचे पुत्र नविद मुश्रीफ यांची अध्यक्षपदी निवड झाली. यावर काँग्रेसने सडकून टीका केली.
दिल्ली दौऱ्यावर असताना सपकाळ म्हणाले की, सहकार हे मंदिरासारखे असते. मात्र, महाराष्ट्राची संस्कृती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हे मान्य नाही, हेच दिसून येते. मुश्रीफ यांची निवड म्हणजे घराणेशाहीच्या माध्यमातून ठोकशाही आहे, असेही ते म्हणाले.
कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) अध्यक्षपदी नविद मुश्रीफ यांची निवड करण्यात आली. अध्यक्षपदाच्या निवडीसाठी शुक्रवारी (दि. 30) संचालक मंडळाची सभा गोकुळ शिरगाव येथील मुख्य कार्यालयात झाली. या निवडीमुळे काँग्रेस जिल्हा अध्यक्ष व आमदार सतेज पाटील यांना धक्का मानला जात आहे.
महायुतीने काँग्रेस आमदार सतेज पाटील यांना धक्का देत डावच उलटवला. अध्यक्षपदासाठी चर्चेत असलेले शशिकांत पाटील-चुयेकर यांचे नाव शेवटच्या क्षणी महायुतीच्या नेत्यांच्या दबावाने मागे पडले. महायुतीकडून नविद मुश्रीफ, अंबरिश घाटगे, अमरसिंह पाटील व अजित नरके यांची नावे अध्यक्षपदासाठी पुढे आली होती. अखेर नाविद मुश्रीफ यांच्या गळात अध्यक्षपदाची माळ पडली.