कोल्हापूर : भाजपने आजपर्यंत दुसरे पक्ष फोडून कार्यकर्त्यांना गिळण्याचे काम केले आहे. या भाजपला थांबवण्याची संधी या निवडणुकीत जनतेला आली आहे. त्यामुळे कोल्हापूरकर काँग्रेस विचारांच्या पाठीशी ठाम राहून महापालिकेची सत्ता काँग्रेसच्या हाती देतील, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला.
कसबा बावडा येथे आयोजित सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी खासदार शाहू छत्रपती होते. यावेळी डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार ऋतुराज पाटील, उद्धव सेनेचे उपनेते संजय पवार, उदय नारकर, दिलीप पवार, सतीशचंद्र कांबळे, रघुनाथ कांबळे, राहुल देसाई, आनंद माने, सौ. पूजा पाटील, पृथ्वीराज पाटील, तेजस पाटील, श्रीराम सेवा संस्था सभापती शीतल पाटील, उपसभापती सुभाष गडगडे आदींसह सर्व उमेदवार उपस्थित होते. सपकाळ पुढे म्हणाले, ही लढाई विचारांची आहे. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकरांचा आणि कोल्हापूरच्या रांगड्या मातीचा विचार आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे.
खा. शाहू छत्रपती म्हणाले, या निवडणुकीचा निकाल काँग्रेसच्या बाजूनेच असणार आहे. काँग्रेसचा जाहीरनामा हा सर्वसामान्य न्याय देणारा आहे. संजय पवार म्हणाले, मिसळ कट्टा चर्चा करणारे शेवटच्या दोन दिवसांत पाव वाटत फिरतील, पण त्यांना बळी पडू नका. डॉ. संजय डी. पाटील म्हणाले, कोणतीही निवडणूक आली की विरोधक डी. वाय. पाटील ग्रुपबद्दल बोलतात. या लोकांनी राजकारण वेगळं ठेवायला पाहिजे होतं. आम्ही कोल्हापूरसाठी चांगल्या गोष्टी करत आलोय. आरोप करणार्या विरोधकांना आम्ही लोकांना दिलेले रोजगार, हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णांना दिलेली सेवा या चांगल्या गोष्टी मात्र दिसत नाहीत.
पाणीदार नेता सतेज पाटील
सतेज पाटील यांनी कोल्हापूरसाठी पाणी आणलं. आपण आडल्या-नडल्यांना , शत्रूलाही पाणी देतो, पण विरोधकांनी त्यात आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला, पण सतेज पाटील हे पाणीदार नेते आहेत. त्यांनी आमदारकी पणाला लावून थेट पाईपलाईन योजना मंजूर करून आणली, त्याबद्दल ते कौतुकास पात्र आहेत.
विरोधी पक्ष नेतेपद मिळू नये म्हणून कारस्थान
सतेज पाटील हे अत्यंत अभ्यासू आहेत. महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची त्यांच्यात धमक आहे, पण ते विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते होऊ नयेत, म्हणून भाजपने कारस्थान रचले. काँग्रेसचे राजीव सातव यांच्या पत्नीला विधान परिषदेचा राजीनामा द्यायला लावला. आ. पाटील यांच्यासारख्या स्वाभिमानी नेतृत्वाला अडवण्यासाठी भाजपने सत्तेचा खेळ केला, असेही सपकाळ यांनी सांगितले.
मला सत्तेचा मुकुट प्यारा नाही
मी अनेक वर्षे सत्तेत राहिलो आहे. त्यामुळे मला सत्तेचा मुकुट प्यारा नाही. तुमचे प्रेम, आशीर्वाद माझ्यासाठी महत्त्वाचा आहे, अशी भावनिक साद घालताना जनतेच्या जीवावर ताकदीने ही लढाई लढतोय, असे आ. पाटील म्हणाले.
मेरे पास जनता है
आ. पाटील यांनी भाषणात ‘दिवार’ पिक्चरचा डायलॉग सांगितला. सध्या भाजपवाले मला हमारे पास पैसा है, सत्ता है, तुम्हारे पास क्या है? असे विचारत आहेत. ‘मेरे पास ये स्वाभिमानी जनता है,’ हे माझे त्यांना उत्तर आहे, असे त्यांनी म्हणताच उपस्थितांनी एकच जल्लोष केला.
100 कोटींचा हिशेब द्या : ऋतुराज पाटील
ऋतुराज पाटील म्हणाले, आमच्यावर वारंवार आरोप करताना तुम्ही काय केले हे कधीतरी सांगा. आमदार सतेज पाटील यांनी थेट पाईपलाईनबद्दल प्रेझेंटेशन करून कोल्हापूरकरांना माहिती दिली. कोल्हापूर खड्डेमय करणार्यांनी रस्त्यांसाठीच्या 100 कोटींचा कधीतरी हिशेब द्यावा.