पेठवडगाव : पुणे-बंगळूर महामार्गावरील किणी टोल नाक्याजवळ अवैधरीत्या वाहतूक करण्यात येणार्या 36 लाखांच्या गुटख्यासह तस्करी करणारा कंटेनर असा 56 लाख रुपयांचा मुद्देमाल पकडण्याची धाडसी कारवाई वडगाव पोलिसांनी सोमवारी रात्री केली.
वडगाव पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक माधव डिघोळे, सहायक फौजदार आबा गुंडणके, महेश गायकवाड, अनिल अष्टेकर हे पुणे-बंगळूर महामार्गावर गस्त घालत असताना, त्यांना खबर्याकरवी एका कंटेनरमधून मोठ्या प्रमाणात गुटखा वाहतूक करण्यात येत असल्याचे समजले. त्यांनी टोल नाक्यावर पाळत ठेवली.
रात्री दोन वाजण्याच्या सुमारास संशयित नंबरशी मिळताजुळता कंटेनर (एम.एच. 04 एचएस 1519) आला असता, नाक्यापासून काही अंतरावर सापळा रचून त्याला बाजूला घेतले. चालक फतरू मशायक पटेल (वय 49, रा. शहावल्ली मोहल्ला, लातूर) याच्याकडे चौकशी केली असता, त्याने कंटेनरमध्ये केमिकलचे बॅरल असल्याचे सांगितले. पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने कंटेनरमध्ये प्रतिबंधित सुगंधी सुपारी, पान मसाला, सुगंधी तंबाखू असा माल असल्याचे सांगितले. रात्री हा कंटेनर वडगाव पोलिस ठाण्याच्या आवारात आणून लावण्यात आला. ही घटना जिल्हा अन्न व औषध प्रशासनास कळविण्यात आली. या विभागाचे अन्नसुरक्षा अधिकारी विजय पाचपुते, पांडुरंग घुगे, विश्वजित गुजर, दिनेश हगवणे, नमुना सहायक दिग्विजय ढवण यांनी वडगाव पोलिस ठाण्यात येऊन शासकीय पंचांसमक्ष या कंटेनरचे लॉक काढले असता, पाठीमागे पत्र्याची 15 रिकामी बॅरल ठेवण्यात आली होती. बॅरल हटविली असता, पूर्ण कंटेनर पान मसाल्याच्या गोण्यांनी भरला होता.
कंटेनरमधील सर्व गोण्या उतरून तपासणी करून पंचनामा करण्यात आला. यावेळी वेगवेगळ्या ब्रँडचा 34 गोण्यांत भरलेला सुमारे 22 लाख 69 हजार 170 रुपये किमतीचा पान मसाला, 98 हजार 10 रुपये किमतीची तीन गोण्या सुगंधी तंबाखू, 6 लाख 81 हजार 156 रुपये किमतीची तीन गोण्या सिल्व्हर सुगंधी तंबाखू व 24 गोण्यांमध्ये भरलेली 5 लाख 88 हजार रुपये किमतीची वाराणसी सुगंधी सुपारी व रेड टोबॅको असा एकूण 36 लाख 36 हजार 36 रुपयांचा प्रतिबंधित माल आढळून आला. कंटेनरसह 56 लाख 36 हजार 336 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबतची फिर्याद पोलिस अंमलदार अनिल अष्टेकर यांनी दिली. पोलिस उपनिरीक्षक खालिक इनामदार अधिक तपास करत आहेत.
चालक फतरू पटेल याने या तस्करीबाबत अनभिज्ञ असल्याचे सांगतानाच, हा कंटेनर कागल चेकपोस्टवर त्याला ताब्यात देऊन पुणे-बंगळूर महामार्गावरील तासवडे (जि. सातारा) टोल नाक्यापर्यंत नेऊन पोहोचविण्याची जबाबदारी दिल्याचे सांगितले. यानंतर या कंटेनरचा ताबा दुसरा चालक घेणार होता. यामुळे हा माल कुठून आला, कुठे न्यायचा याबद्दल माहिती नसल्याचे सांगितले. जप्त करण्यात आलेली संपूर्ण सुगंधी सुपारी, तंबाखू कर्नाटकातील हुबळीजवळील एका औद्योगिक वसाहतीत तयार करण्यात आली असून, त्यावर उत्पादन तारीख आहे; मात्र बॅच नंबर नाही. या मालाची वाहतूक करणार्या गाडीत ट्रान्स्पोर्ट किंवा वाहतुकीसाठीची असणारी कोणतीही कागदपत्रे आढळली नाहीत.