महामार्गावर गुटखा माफियाराज, शंभर कोटींची उलाढाल रोज Pudhari File Photo
कोल्हापूर

kolhapur News | महामार्गावर गुटखा माफियाराज, शंभर कोटींची उलाढाल रोज

बंदी आदेशाचा फज्जा; प्रशासनाचा कारवाईचा फार्स

पुढारी वृत्तसेवा

दिलीप भिसे

कोल्हापूर : साक्षात मृत्यूला निमंत्रण देणार्‍या गुटखानिर्मितीसह विक्रीला मनाई आणि कठोर कारावासाची तरतूद असतानाही तस्करी टोळ्यांनी आदेश बासनात गुंडाळल्याचे चित्र आहे. झटपट कमाई करून देणार्‍या उलाढालीत कर्नाटक, गोव्यासह सीमा भागातील तस्करी टोळ्या सक्रिय आहेत. तस्करांनी महामार्गांसह कर्नाटकला जोडणार्‍या रस्त्यावर कब्जा केला आहे. कोल्हापूरमार्गे सांगली, सातार्‍यासह सोलापूर जिल्ह्याकडे रोज शंभर कोटींची तस्करी होत असल्याचे चित्र आहे.

महामार्गावरील तस्करीला रोखण्यासाठी रात्रंदिवस गस्तीपथके कार्यरत असल्याचा प्रशासनाकडून दावा केला जातो. मात्र सुरक्षा यंत्रणा भेदून गुटखाच काय, अमली पदार्थांचीही तस्करी केली जात आहे. गुटख्यासह माव्याच्या व्यसनाने तरुणाईच्या आरोग्याची गंभीर स्थिती निर्माण झालेली असतानाही तस्करीचे लोण शहर, ग्रामीण भागातही वेगाने फोफावू लागले आहे. 17 ते 25 वयोगटातील तरुणामध्ये तर गुटख्याचे व्यसन म्हणजे नुसते फॅडच बनले आहे.

जिल्ह्यात तस्करांची पाळेमुळे

कोल्हापूर शहरासह कागल, मुरगूड, इचलकरंजी, शहापूर, शिरोळ, कुरुंदवाड, जयसिंगपूर, वडगाव, हुपरी, सांगली फाट्यासह आजरा, चंदगड, गडहिंग्लज परिसरात सीमाभागातील नामचीन गुटखा तस्करी टोळ्यांची पाळेमुळे पसरली आहेत. स्थानिक गुंडांना हाताशी धरून तस्करीचा फंडा चालविला जात आहे. तहसील कचेर्‍यांसह पोलिस ठाण्यांच्या आवारातही टपर्‍यांवर गुटखा, माव्यांची उघड उघड विक्री होत असल्याचे चित्र आहे. शासकीय कचेर्‍यातल्या भिंती गुटखा, माव्यांच्या पिचकार्‍यांनी रंगलेल्या असतानाही अन्न व औषध प्रशासनासह पोलिस अधिकार्‍याकडून या प्रकाराकडे डोळेझाक होत आहे. गुटखा बंदी कायद्याला आव्हान देत टोळ्यांच्या उलाढाली सुरू आहेत.

भर चौकामधील गुटखा तस्करीचे अड्डे

इचलकरंजीसह शहापूर, जयसिंगपूर, कुरुंदवाड, शिरोळ परिसरातील गुटखा तस्करांवर कायद्याचा धाकच राहिला नसल्याचे चित्र आहे. ‘टपर्‍या पानाच्या, पण उलाढाली तस्करीच्या’ असा बेधडक प्रकार सुरू आहे. या उलाढालीतून मालामाल झालेल्या काही टोळ्यांच्या म्होरक्यांनी मध्यवर्ती चौकात 50-50 लाख किमतीचे गाळे घेऊन तस्करीचे अड्डेच चालविले आहेत. अर्थात स्थानिक पोलिस, गुन्हे प्रकटीकरण पथक आणि अन्न व औषध प्रशासनाला याची खबरबात नसावी, अशीही स्थिती नाही. हप्तेबाजीला सोकावलेल्या झारीतील शुक्राचार्यांच्या आश्रयामुळे तस्करांनी आव्हान उभे केले आहे.

शाळा-कॉलेज, बस, रेल्वे स्थानक आवारात खुलेआम तस्करी

शाळा, कॉलेज, धार्मिक स्थळांसह बस, रेल्वेस्थानक आवारात गुटख्यासह सुगंधी सुपारीच्या उत्पादन व विक्रीवर शासनाने 17 जुलै 2015 रोजी मनाई आदेश जारी केला आहे. मात्र आदेशाचे उघड उघड उल्लंघन केले जात आहे. शहरात शाळा, कॉलेजसह बसस्थानक आवारात गुटखा, माव्याची राजरोस विक्री होत आहे. गुटखा बंदी कायद्याचा फज्जा उडालेला असतानाही संबंधित सर्वांचे मौन शंकास्पद ठरते आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT