कोल्हापूर : गुरुपौर्णिमा म्हणजे गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. ‘गुरु ब्रह्मा गुरु विष्णु...’ हे मंत्र उच्चारत आपण बालपणापासून गुरूची महती ऐकत आलो आहोत; परंतु काळ बदलतो तसं प्रत्येक नातं बदलतं आणि त्यातही गुरू-शिष्य नातं आणि गुरूविषयीची संकल्पना काळानुरूप बदलली आहे. गुरुकुलापासून सुरू झालेले गुरू-शिष्यबंधाचा प्रवास डिजिटल युगापर्यंत येऊन पोहोचला आहे. या प्रवाहात केवळ शैक्षणिक ज्ञान देणारे शिक्षकच नव्हे, तर प्रेरणादायी वक्ते, पुस्तक, अनुभव हेदेखील तरुणाईचे गुरू झाले आहेत.
नव्या युगाच्या माध्यमांमुळे ज्यांना कधी प्रत्यक्ष पाहिले नाही, भेटले नाही त्यांच्यातही गुरुशिष्याचे पूल जोडले जात आहेत. प्राचीन काळातील गुरुकुल पद्धती, संतांच्या आत्मिक शिक्षणाची परंपरा, शाळा-महाविद्यालयांतील शिक्षकांचं मार्गदर्शन आणि आता सोशल मीडियावरून मिळणारी प्रेरणा या प्रवासाने गुरू-शिष्य नात्याची परिमाणे बदलली; पण त्यामागचा आदर, श्रद्धा आणि शिकण्याची जिज्ञासा कायम राहिली आहे. यानिमित्ताने तरुणाईशी संवाद साधला बदलती गुरुस्थानं अधोरेखित झाली.
वैदिक काळात गुरुकुल संकल्पनेत शिष्य गुरूंच्या घरी वास्तव्य करत. ते केवळ शैक्षणिक नव्हे, तर वैयक्तिक आयुष्याचे संस्कारही तेथून घेत. संतकाळात गुरू हे आत्मज्ञानाचे स्रोत होते. शैक्षणिक प्रवाहात क्रमिक अभ्यास शिकवत मार्गदर्शन करणार्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दिशा दिली, तर आजच्या डिजिटल युगात मुठीतल्या मोबाईलमधील समाजमाध्यमांनी तरुणाईच्या आयुष्यात गुरूचे स्थान मिळवले आहे. आजचा तरुण सोशल मीडिया आणि ऑनलाईन कोर्सेसवरून प्रेरणा घेतो. प्रेरणादायी वक्ते आयुष्याचे सार सांगत आहेत. ‘गुरू ऑन-डिमांड’ हे युग निर्माण झाले आहे.
अपयश, संघर्ष, आणि आत्मपरीक्षण यातूनही आजचा युवक शिकत आहे. औपचारिक शिक्षणाच्या परिघातून अनौपचारिक शिक्षणाच्या वर्तुळात येणार्या तरुणांना नोकरी, व्यवसायात जे चढउतार येतात, त्यातून चांगल्या-वाईटाची जाण निर्माण होते ते अनुभवही गुरूप्रमाणे शिकवण देणारे ठरत आहेत.
जो मार्गदर्शन देतो; पण जबरदस्ती करत नाही
जो प्रेरणा देतो; पण नियंत्रण ठेवत नाही
जो ज्ञान देतो; पण प्रश्न विचारायलाही शिकवतो
जो चुका दाखवतो; पण अपयशात साथही देतो
45 टक्के युवक ऑनलाईन स्पीकर्सना गुरू मानतात
15 टक्के युवकांना समाजातील संघर्षातून यशस्वी व्यक्ती प्रेरित करतात
15 टक्के युवक शिक्षक व पालकांना गुरुस्थान देतात
25 टक्के युवक संघर्ष व अनुभवातून शिकतात