बा. ल. वंदूरकर
कागल : साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वीच कागल तालुक्यातील गुर्हाळघरांच्या चुलवानांमधून धूर निघू लागला आहे. ऊस दराच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी गुर्हाळ मालकांनी आता साखर कारखान्यांच्या दराशी बरोबरी करणारा दर देण्यास सुरुवात केली आहे. तोडणी व वाहतुकीसह प्रतिटन ३ हजार ५०० रुपयांपर्यंत दर देऊन, ऊस गेल्यानंतर महिन्याच्या आत एकरकमी रक्कम अदा केली जात असल्याने शेतकर्यांचा गुर्हाळ घरांकडे कल वाढू लागला आहे.
विशेष म्हणजे, ऊस कोणत्याही ठिकाणी वजन करून आणला, तरी त्याची वजनाची पावती ग्राह्य धरली जात आहे. पावती सादर केल्यानंतर ऊस स्वीकारला जात असल्याने शेतकर्यांना वाहतूक व वजनाच्या प्रक्रियेत अधिक सुलभता मिळत आहे. त्यातच कोणत्याही प्रकारची कपात न करता रक्कम देणे, तसेच अडचणीच्या काळात शेतकर्यांना आगाऊ पैसे उपलब्ध करून देणे, यामुळे गुर्हाळघरांकडे ऊस पुरवठा करणार्या शेतकर्यांची संख्या वाढत आहे. काही गुर्हाळघरांकडे तर ऊस देण्यासाठी प्रतीक्षा यादी निर्माण होऊ लागली आहे.
कागल परिसरात गुर्हाळ घरांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, काही गुर्हाळघरे आता बारमाही सुरू ठेवली जात आहेत. पावसाळ्यात स्थानिक भागातील ऊस उपलब्धतेवर मर्यादा येत असल्याने कर्नाटकातील घटप्रभा, रायबाग, आरग, बेडग आदी भागांतून ऊस आणून गुर्हाळ व्यवसाय सुरू ठेवला जातो. गुर्हाळ मालकांनी स्वतःची वाहने तसेच ऊसतोडणीच्या टोळ्या तयार केल्या आहेत. या टोळ्यांना आगाऊ रक्कम देऊन ऊसतोडणी व वाहतुकीची व्यवस्था केली जाते. गुर्हाळघरात काम करणार्या कामगारांच्या निवासाचीही व्यवस्था केली जाते. उसाची रिकव्हरी तपासून त्यानुसार उत्पादनाचे नियोजन केले जात आहे.
ऊस बाजारपेठेत नवा मुद्दा
साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाल्यानंतर दराच्या मुद्द्यावरून शेतकरी संघटना, ऊस उत्पादक आणि कारखाना व्यवस्थापन यांच्यात आंदोलने व वाद निर्माण होतात. त्यापूर्वीच गुर्हाळघरांकडून दिला जाणारा प्रतिटन ३ हजार ५०० रुपयांपर्यंतचा दर, त्वरित एकरकमी पेमेंट, कपात नसणे आणि आगाऊ रक्कम देण्याची पद्धत यामुळे ऊस बाजारपेठेत नवा मुद्दा पुढे आला आहे. पाच किलोमीटरच्या परिसरातील उसाची वाहतूक प्रामुख्याने केली जात आहे.