Kolhapur Agricultural Produce Market Committee | गुजरातच्या व्यापार्‍यांचा गूळ खरेदी बंद करण्याचा निर्णय Pudhari File Photo
कोल्हापूर

Kolhapur Agricultural Produce Market Committee | गुजरातच्या व्यापार्‍यांचा गूळ खरेदी बंद करण्याचा निर्णय

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : केमिकल व भेसळयुक्त गूळ विक्रीसाठी येत असल्याने गुजरातमधील गूळ व्यापारी असोसिएशनने सोमवारपासून कोल्हापूर, सांगलीमधील गूळ खरेदी बंद करण्याचा निर्णय घेतल्याने खळबळ उडाली आहे.

दरम्यान, कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी तिसर्‍या दिवशीही गूळ सौदे बंद राहिले. दिवसाआड सौदे काढण्याच्या भूमिकेवर हमाल ठाम राहिले. सौदे बंद राहिल्यामुळे शेतकर्‍यांनी समितीचे गेट बंद करून व्यवहार बंद पाडण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत हस्तक्षेप केल्यानंतर गेट उघडत वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली. हमालांनी काम कमी असल्याने गावाहून येण्या-जाण्याच्या खर्चाइतपतही हजेरी पडत नसल्याने दिवसाआड गूळ सौदे काढण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे मंगळवारी सकाळी गूळ सौदे बंद राहिले. यावर तोडगा न निघाल्यामुळे बुधवारीही सौदे बंद राहिले. यामुळे शेतकरी आक्रमक झाले. त्यांनी गेट बंद करत आंदोलन केले. उपसभापती राजाराम चव्हाण यांनी शेतकरी, हमाल, व्यापारी यांच्याशी चर्चा केली. एक दिवस आड गूळ सौदे काढण्याबाबत शनिवारी बैठक घेऊन निर्णय घेण्यावर सर्वांचे एकमत झाले. उशीर झाल्याने बुधवारी सौदे बंद होते.

शेतकर्‍यांनी बंद केले बाजार समितीचे गेट

कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये तिसर्‍या दिवशीही गुळ सौदे बंद राहिल्याने संतप्त झालेल्या गुळ उत्पादक शेतकर्‍यांनी समितीचे प्रवेशव्दार बंद करत वाहतूक रोखली. गुळ सौदे बंद तर समितीमधील सर्वच व्यवहार बंद अशी आक्रमक भूमिका शेतकर्‍यांनी घेतली. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर वाहतूक सुरू करण्यात आली. तर हमालांच्या दिवसाआड गुळ सौदे काढण्याच्या भूमिकेबाबत निर्णय घेण्यासाठी शनिवारी बैठक बोलवली आहे.

बाजार समितीमधील हमाल दिवसाआड गुळ सौदे काढण्याच्या भूमिकेवर बुधवारीही ठाम राहिल्याने सलग तिसर्‍या दिवशी गुळ सौदे बंद राहिले. त्यामुळे गुळ घेऊन आलेले शेतकरी आक्रमक झाले. त्यांनी बाजार समितीचे प्रवेशव्दार बंद केले. या प्रकारामुळे समितीने पोलिसांना बोलावले. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर प्रवेशव्दार खुले करण्यात आले. यानंतर उपसभापती राजाराम चव्हाण यांनी हमाल, व्यापारी, शेतकरी यांच्याशी चर्चा केली. हमालांना नियमित काम करण्यास सांगितले. मात्र, हमालांनी तात्पुरत्या स्वरुपात नियमितपणे काम करण्यास तयारी दर्शविली.

गुळ सौदे बंद, उलाढाल ठप्प

दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास हमालांनी गुळ उतरून घेण्यास तयारी दर्शवली. मात्र, यावेळी खरेदीदार निघून गेले होते. तसेच व्यापार्‍यांनीही इथून पुढे गुळ उतरून त्याचे पुन्हा पॅकिंग करून गुळ पुढे पाठवणे अशक्य असल्याचे सांगितले. त्यामुळे सौदे बंदच राहिल्याने गुळ विभागातील उलाढाल ठप्प राहिली.

दिवसाआड सौद्यांबाबत शनिवारी बैठक

हमालांच्या दिवसाआड गुळ सौदे काढण्याच्या भूमिकेबाबात समिती प्रशासनाने व्यापारी, अडते, शेतकरी, हमाल यांची शनिवारी (दि. 11) बैठक आयोजित केली आहे. बैठकीमध्ये दिवसाआड सौद्यांबाबत निर्णय होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT