कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : Gudhi Padava Shoping : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर बाजारपेठेत खरेदीचा अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळाला. येथील सराफ बाजार, इलेक्ट्रॉनिक्स आणि मोबाईल शोरुम्स तसेच दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या शोरुम्ससह कपड्यांच्या दुकानांत ग्राहकांची तोबा गर्दी होती. सुमारे 150 ते 200 कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचे बाजारपेठांतून सांगण्यात आले. वाढलेले सोन्याचे दर कमी झाल्याने सराफ बाजारात खरेदीला चांगली गर्दी होती.
सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याला पसंती दिली जाते. मुहूर्ताच्या खरेदीसाठी सराफ बाजार सायंकाळी गर्दीने फुलला होता. सोन्याचा प्रतितोळा दर साठ हजारी पार झाल्याच्या पार्श्वभूमीवर छोट्या, कमी वजनाच्या दागिन्यांना बाजारात मोठी मागणी होती. त्यामध्ये अंगठ्या, रिंग्ज, चेन्स यांचा समावेश होता. वळे, नाणी, बिस्किटे यांनाही ग्राहकांची गुंतवणूक म्हणून पसंती होती. मंगळवारच्या तुलनेत बुधवारी सोन्याचे दर स्थिरच राहिले. जीएसटीसह दर साठ हजारांच्या वर दर असूनही मुहूर्ताच्या खरेदीवर त्याचा कोणताही परिणाम झाला नसल्याचे कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष राजेश राठोड यांनी दै. 'पुढारी'शी बोलताना सांगितले.
Gudhi Padava Shoping : सोन्याचा दर
बुधवारी सोन्याचा दर 58 हजार 700 रुपये (जीएसटी स्वतंत्र) राहिला. सोमवारी सोन्याचा दर 60 हजार 300 होता. त्यामध्ये मंगळवारी 1 हजार 500 रुपयांची घसरण झाली. तो बुधवारी स्थिर राहिला; तर चांदीचा दर किलोमागे 68 हजार 900 रुपये (जीएसटी स्वतंत्र) राहिला.
Gudhi Padava Shoping : मोबाईल खरेदीला ग्राहकांची पसंती
मुहूर्तावर बहुतेक मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक गॅजेटच्या शोरुम्सनी ग्राहकांसाठी ऑफर जाहीर केल्या होत्या. त्या ऑफरवर ग्राहकांच्या अक्षरश: उड्या पडत होत्या. सर्वच मोबाईल दुकाने गर्दीने ओसंडून वाहत होती. त्यांनी जाहीर केलेल्या ऑफरला ग्राहकांनी मोठा प्रतिसाद दिला. तसेच फायनान्सकडून सुलभ हप्त्यावर, नाममात्र दैनिक हप्त्यावर मोबाईल उपलब्ध होत असल्याने त्याला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. मोबाईल्स आणि इलेक्ट्रॉनिक्स गॅजेटस्च्या बाजारात 50 हून अधिक कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचे या क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले.
इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या खरेदीचा उत्साह प्रचंड होता. शोरुम्सनी दारात मंडप घालून आपली उत्पादने आकर्षकपणे मांडली होती. एलईडी टी.व्ही., फ्रिज, वॉशिंग मशिन, ए.सी. यांना मोठी मागणी राहिली. मायक्रोवेव्ह, मिक्सर, फूड प्रोसेसर आदी गृहोपयोगी वस्तूंनाही चांगली मागणी होती. या बाजारपेठेत सुमारे 10 ते 12 कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचे व्यापार्यांनी सांगितले. ग्राहकांचा फ्रिज आणि वॉशिंग मशिन खरेदीकडे जास्त कल होता. शहरातील प्रमुख शोरुम्ससह छोट्या-मोठ्या दुकानांतूनही स्मार्ट टी.व्ही. आणि मोठ्या आकाराचे टी.व्ही. यांची चांगली विक्री झाली.
Gudhi Padava Shoping : कापड खरेदीसाठीही गर्दी
कापडपेठेतही खरेदीचा उत्साह दिसून आला. रेडिमेड कपड्यांचे नवनवीन प्रकार आणि त्यावर सवलती यामुळे या ठिकाणी गर्दी होती.
Gudhi Padava Shoping : वाहन बाजारात खरेदीची धूम
पाडव्याच्या मुहूर्तावर ग्राहकांनी दुचाकी व चारचाकी नेण्यासाठी अगोदरच बुकिंग केले होते. त्याप्रमाणे ही वाहने नेण्यासाठी शोरुम्समध्ये दिवसभर गर्दी होती. दुचाकी बाजारात इलेक्ट्रिक बाईकची सर्वाधिक क्रेझ कायम आहे. सर्वच कंपन्यांनी नवनवीन मॉडेल्स लाँच केल्याने वाहनांची शोरुम्सही हाऊसफुल्ल होती. दुचाकी आणि चारचाकी वाहनांची विक्री चांगली झाली. अनेक ग्राहकांनी पाडव्याच्या मुहूर्तावर बुकिंगही केले.