विकास कांबळे
कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या सभापती निवडीत पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांची एंट्री झाली आहे. यावेळी शिवसेना शिंदे गटाला सभापतिपद मिळावे, यासाठी त्यांनी आग्रह धरला असल्याचे समजते. त्यामुळे बाजार समिती सभापतिपदाच्या निवडीतील उत्सुकता वाढली आहे. यासंदर्भातील चित्र आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीनंतरच स्पष्ट होईल.
कोल्हापूर बाजार समितीच्या निवडणुकीत माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या विरोधात मंत्री हसन मुश्रीफ, आ. सतेज पाटील यांनी मोट बांधली होती. पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार विनय कोरे, माजी आमदार के. पी. पाटील, ए. वाय. पाटील, संजय घाटगे यांना त्यांनी सोबत घेतले. पण, राज्यापासून जिल्ह्यापर्यंत राजकारण बदलले. जिल्ह्यात सतेज पाटील व हसन मुश्रीफ यांच्या दोस्तीला गोकुळ अध्यक्ष निवडीत तडा गेला. महायुती आणि महाविकास आघाडी असे सहकारातही पक्षीय राजकारण घुसले अन् सतेज पाटील गोकुळमध्ये एकटे पडले.
बाजार समितीच्या निवडणुकीत आघाडी करताना काँग्रेसला एक वर्ष व राष्ट्रवादी आणि जनसुराज्य शक्ती यांना प्रत्येकी दोन वर्षे सभापतिपद असा फॉर्म्युला ठरला आहे. त्यानुसार सध्या पदनियुक्ती सुरू आहे. पहिला सभापती काँग्रेसचा झाला. त्यानंतर जनसुराज्य शक्ती पक्षाचा. जनसुराज्यचे प्रकाश देसाई यांनी मुदत संपताच सभापतिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे सभापती निवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे. निवड दोन दिवसांवर आली असताना आता पालकमंत्री आबिटकर यांनी सहकारामधील शिवसेनेकडे एकही पद नसल्यामुळे बाजार समितीमधील सभापतिपद शिवसेना शिंदे गटाला मिळावे, अशी मागणी केली आहे. आबिटकर सध्या पालकमंत्री असल्यामुळे त्यांच्या शब्दाला आता जिल्ह्याच्या राजकारणात वजन आले आहे. त्यामुळे बाजार समितीच्या सभापतिपदाची एकतर्फी वाटणार्या निवडीत उत्सुकता निर्माण झाली आहे.
दरम्यान, सभापतिपद राष्ट्रवादीकडे (अजित पवार) आल्यामुळे सभापतिपदासाठी शेखर देसाई यांचे नाव आघाडीवर आहे. मेघा देसाई व शिवाजीराव पाटील यांचीही नावे चर्चेत आहेत; परंतु सभापतिपद राष्ट्रवादीला द्यायचे की पुन्हा जनसुराज्यकडे पुन्हा एक वर्ष ठेवायचे, याबाबतही दोन्ही पक्ष नेत्यांत चर्चा सुरू आहे. ही चर्चा सुरू असतानाच पालकमंत्री आबिटकर यांनी सभापतिपदासाठी आग्रह धरण्यामुळे संदीप वरंडेकर यांचे नावही सभापतिपदासाठी पुढे आले आहे.
बाजार समितीत मंत्री मुश्रीफ व आ. कोरे यांच्याशिवाय पानही हलत नाही. सभापती निवडीसह महत्त्वाचे निर्णय हे दोघेच समन्वयाने घेतात. सभापती पदाची सध्या राष्ट्रवादीला संधी असून त्यासाठी के. पी. पाटील हे भुदरगडातील शेखर देसाई यांच्यासाठी आग्रही आहेत. मंत्री मुश्रीफ स्वतःच्या तालुक्यात सभापतिपद घेण्याऐवजी या पर्यायाचाही विचार करू शकतात. अशातच पालकमंत्री यांनी सभापतिपदाची मागणी केली आहे. ही मागणी ना. मुश्रीफ व आ. कोरे या दोघांच्या कितपत पचनी पडते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
बाजार समिती सभापतिपदासाठी आघाडीच्या नेत्यांची बैठक रविवारी (दि. 6) होणार आहे. ही बैठक कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये होण्याची शक्यता आहे. या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.