वारणानगर : दख्खनचा राजा जोतिबाच्या चरणी अर्पण करणारा ‘दवणा’ केखले गावातच पिकतो. याचे पेटंट मिळविण्यासाठी प्रयत्न करून हा कोल्हापूरच्या जोतिबाचा दवणा महाराष्ट्रात प्रसिद्ध करण्याचा संकल्प राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केला.
केखले (ता. पन्हाळा) येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार डॉ. विनय कोरे होते. यावेळी आमदार अशोकराव माने, जनसुराज्याचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, गोकुळचे संचालक अमरसिंह पाटील, केडीसी बँकेचे संचालक विजयसिंह माने, शेतकरी संघाचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे, वारणा दूध संघाचे उपाध्यक्ष एच. आर. जाधव आदी उपस्थित होते.
हा दवणा जोतिबा यात्रेच्या काळात मोठ्या प्रमाणात वापरला जातो. दवणा ही सुगंधी औषधी वनस्पती आहे. जोतिबा देवाला अर्पण करण्यासाठी या दवणाला विशेष महत्त्व आहे. यात्रा काळात भाविक दवणा, गुलाल, खोबरे देवाला अर्पण करतात, असे नागरिकांनी सांगितले.