कोल्हापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमचे मार्गदर्शक आहेत. यापूर्वीही त्यांचे मार्गदर्शन घेतले, यापुढेही घेणार आहे. त्यातूनच गोकुळमध्ये महायुतीचीच सत्ता येणार, असा दावा करत पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आमदार सतेज पाटील यांना सोमवारी प्रत्युत्तर दिले.
आ. पाटील यांनी महायुतीचे जिल्ह्यातील नेते कमकुवत आहेत. यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांना गोकुळमध्ये लक्ष घालावे लागत असल्याची टीका केली होती. याबाबत विचारता आबिटकर म्हणाले, सतेज पाटील यांनी काय म्हणावे, हा त्यांचा प्रश्न आहे. त्याबाबत आपल्याला काय म्हणायचे नाही; मात्र मुख्यमंत्री फडणवीस हे महायुतीचे नेते आहेत. त्यांच्याच नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील नगरपालिका, जिल्हा परिषद आणि दोन्ही महापालिकेच्या निवडणुका लढवल्या आणि जिंकल्या आहेत.
मुख्यमंत्री फडणवीस यांचे सातत्याने मार्गदर्शन मिळत आहे आणि ते मिळत राहणार आहे, असे सांगत गोकुळमध्ये महायुतीचीच सत्ता येणार आहे. शेतकर्यांना न्याय देण्याची भूमिका महायुतीची राहिली आहे. गोकुळमध्येही दूध उत्पादक शेतकरीच महायुतीच्या केंद्रस्थानी राहील, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी लवकरच नगरसेवक आणि जि.प. सदस्य यांची नियुक्ती होईल. पुढील नियोजन बैठकीपूर्वी ही सर्व प्रक्रिया पुर्ण होईल. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका उशिरा झाल्याने जिल्हा नियोजन समिती सदस्य पदाच्या निवडी लांबल्या असल्याचे आबिटकर म्हणाले. राज्यातील महामंडळाच्या नियुक्त्याही लवकर होती. असेही त्यांनी सांगितले. यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर उपस्थित होते.