कोल्हापूर : जिल्हा परिषदेमध्ये पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आढावा बैठक घेतली. सोबत प्रशासक कार्तिकेयन एस., प्रकल्प संचालक सुषमा देसाई.  Pudhari File Photo
कोल्हापूर

kolhapur News : अधिकार्‍यांनी नावीन्यतेसह गुणवत्तापूर्ण कामे करावीत

पालकमंत्री आबिटकर यांच्या सूचना; जिल्हा परिषदेतील सर्व विभागांचा घेतला आढावा

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : जिल्हा परिषद नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात नेहमीच अग्रेसर आहे; परंतु नावीन्यपूर्ण उपक्रम राबवित असताना ते काम गुणवत्तापूर्ण कसे होईल याकडे सर्व विभाग प्रमुखांनी लक्ष द्यावे, अशा सूचना पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सोमवारी आढावा बैठकीत जिल्हा परिषद अधिकार्‍यांना दिल्या.

केवळ खरेदीकडे लक्ष न देता यापूर्वी खरेदी केलेल्या साहित्याचे विनयोग योग्य पद्धतीने होतो की नाही हेही पाहावे. गावाला होणार्‍या पाणी पुरवठ्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, दूषित पाणीपुरवठा झाल्यास संबंधितांवर कडक कारवाई करा, असे आदेशही त्यांनी दिले. पालकमंत्री झाल्यानंतर आबिटकर यांनी सोमवारी प्रथमच आढावा बैठक घेतली. वसंतराव नाईक समिती सभागृहात तीन तास ही बैठक चालली.

लोकांना हवी ती कामे करा

ग्रामपंचायत विभागाच्या वतीने सुरू असलेल्या कामांची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव यांनी दिली. आढावा घेतल्यानंतर आबिटकर यांनी ग्रामसेवक व अधिकार्‍यांनी ठरविलेली कामे न करता गावाला काय पाहिजे याची माहिती घेऊन काम करावे, कामामध्ये अपेक्षित बदल दिसला पाहिजे, अशा पद्धतीचे प्रशिक्षण ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना द्यावे, असे सांगितले.

ग्रामपंचायतीच्या परवानगीशिवाय रस्ते उकरू नयेत

ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अर्जुन गोळे यांनी योजनांची माहिती दिली. यानंतर आबिटकर यांनी, जलजीवन मिशनमधील कामे लवकरात लवकर करावीत. ग्रामीण भागातील रस्ते उकरून ठेवण्यात आल्यामुळे नागरिकांतून तीव— प्रतिक्रिया आहे. यापुढे ग्रामपंचायतीच्या परवानगीशिवाय उकरू नये, अशा सूचना दिल्या.

अनुदानित शाळांची अस्थापना काटेकोर तपासावी

शिक्षण विभागाने संगणक खरेदी करण्यापूर्वी अगोदर ज्या शाळेत संगणक आहेत त्याचा वापर किती होतो हे पाहावे. शिक्षक, मुख्याध्यापक यांच्या पदोन्नती कराव्यात. मुलांच्या आरोग्यासाठी राबविण्यात येणार्‍या योजनांकडे लक्ष द्यावे. माध्यमिक शिक्षण विभागाने शंभर टक्के अनुदानित शाळांची अस्थापना काटेकोरपणे तपासावी. शाळांजवळ पानपट्टी असणार नाही याची दक्षता घ्यावी. मुलाना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी पालकसभा आयोजित कराव्यात, अशा सूचना आबिटकर यांनी दिल्या. प्रा. शिक्षणाधिकारी डॉ. मिना शेंडकर व माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. एकनाथ आंबोकर यांनी आपापल्या विभागाची माहिती दिली.

उपचार करा.. संदर्भ सेवा बंद करा

आरोग्य विभागाची कानउघाडणी करताना आबिटकर म्हणाले, ग्रामीण भागासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र हा मोठा आधार असतो. त्यामुळे या ठिकाणीच रुग्णांवर चांगल्या पद्धतीचे उपचार कसे होतील याकडे डॉक्टरांनी लक्ष द्यावे. आलेल्या रुग्णाला केवळ संदर्भ सेवा म्हणून नोंद करून आपली जबाबदारी टाळू नका. खरेदीची प्रक्रिया पारदर्शकपणे राबवावी. सर्व औषध निर्माण अधिकार्‍यांच्या बदल्या कराव्यात. नियमित कामाबरोबरच शाळांमधील विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय तपासणीकडेही लक्ष द्यावे, असेही ते म्हणाले.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांनी आरोग्य विभागाची माहिती दिली. बांधकाम विभागातील दोन अधिकार्‍यांच्या कारभारामुळे जिल्हा परिषदेची बदनामी होते. असे प्रकार थांबवण्यासाठी चुकीचे काम करणार्‍यांवर कडक कारवाई करावी. जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात येणारे बांधकाम पारंपरिक पद्धतीने व सरकारी छापाची न करता आकर्षक कशी होतील याकडे लक्ष द्यावे. त्यासाठी आर्किटेक्चरचे एखादी समिती स्थापन करावी, असे त्यांनी सांगितले. कार्यकारी अभियंता सचिन सांगावकर यांनी बांधकाम विभागाची माहिती दिली. पशुसंवर्धन विभागाच्या वतीने राबविण्यात येणारा कृत्रिम रेतन नावीन्यपूर्ण उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.

प्रकल्प संचालक सुषमा देसाई, महिला व बाल विकास विभागाच्या जिल्हा कार्यक्रम अधिकारी शिल्पा पाटील, समाजकल्याण विभागाची संदीप खारगे यांनी आपल्या विभागातील माहिती दिली.

स्वच्छ पाणीपुरवठ्याकडे लक्ष द्या

पाणी स्वच्छता विभागाच्या वतीने माधुरी परीट यांनी माहिती दिली. यावेळी आबिटकर यांनी, आरोग्याच्या समस्या दूषित पाण्यामुळे निर्माण होतात त्यामुळे प्रत्येक गावाने पाणी स्वच्छतेकडे लक्ष दिल्यास आरोग्याचे निम्मे प्रश्न सुटण्यास मदत होईल. पाणी व स्वच्छता विभाग, आरोग्य विभाग आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभाग यांनी यासंदर्भातील अहवाल तयार करून तो सादर करावा, असे त्यांनी सांगितले. दूषित पाण्याला जबाबदार असणार्‍यांवर कडक कारवाई करावी, असे आदेशही त्यांनी दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT