कोल्हापूर : सर्व बंधारे, नालेसफाई, रस्ते दुरुस्ती आदींसह मान्सूनपूर्व तयारी येत्या 15 दिवसांत पूर्ण करा, असे आदेश पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. आपत्ती व्यवस्थापनाच्या कामात हलगर्जीपणा आढळून आल्यास संबंधित अधिकार्यांवर निलंबनाची कारवाई करू, असा इशाराही त्यांनी दिला.
जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी झालेल्या मान्सूनच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील संभाव्य पूरस्थिती आणि आपत्ती व्यवस्थापन पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्ह्यात 15 जुलै ते 15 ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टीचा धोका अधिक असतो. हा गेल्या 25 वर्षांचा अनुभव लक्षात घेऊन सूक्ष्म नियोजन करा, असे सांगत आबिटकर म्हणाले, सर्व बंधारे, नाल्यातून पाण्याचा योग्य निचरा झाला पाहिजे. कोणतेही रस्ते किरकोळ कारणांनी ब्लॉक होणार नाहीत, याची दक्षता घ्या. त्याकरिता सर्वेक्षण करा आणि त्यानुसार कामे करा. याबाबतचा अहवालही जिल्हा प्रशासनाला सादर करा.
दरड कोसळण्याची भीती लक्षात घेता भूगर्भ तज्ज्ञांच्या अभ्यासानुसार उपाययोजना करा, अशा सूचना करत ते म्हणाले, जिल्हा परिषदेमार्फत जनजागृती मोहीम राबवा. कृषी विभागाने वेळेत पंचनामे करावेत आणि आरोग्य विभागाने आपत्कालीन औषध साठा तयार ठेवावा. पावसाळ्यात रस्ते किंवा ओढे ओलांडताना एकही दुर्घटना नको. जिल्ह्यातील शाळांच्या दुरुस्तीसाठी पाच वर्षांसाठी 110 कोटींचा निधी मंजूर असून त्यातून अतिशय खराब झालेल्या शाळांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून प्राधान्याने कामे पूर्ण करा, असे आदेशही त्यांनी दिले.
बैठकीला पोलिस अधीक्षक निलोत्पल, मनपा आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड, सीईओ डॉ. जॅसमिन, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, कार्यकारी अभियंता स्मिता माने, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सर्वच अधिकारी नवे, गोंधळ नको
जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस अधीक्षक हे सर्वच प्रमुख अधिकारी नवे आहेत. यापूर्वीच्या अधिकार्यांना माहिती होती. यामुळे गोंधळ नको. समन्वयाने आपत्ती व्यवस्थापनाचे काम करा, असेही पालकमंत्री आबिटकर यांनी सांगितले.
नद्यातील गाळ काढण्याबाबत बैठक
नदीपात्रातील केंदाळ, गाळ आणि वाढते प्रदूषण यांमुळे पुराची तीव—ता वाढत असल्याचा मुद्दा खासदार धैर्यशील माने यांनी मांडला. आमदार राहुल आवाडे यांनी इचलकरंजीच्या पाणीपुरवठ्यावरील ताण आणि केंदाळ काढण्यासाठी कायमस्वरूपी निधीची मागणी केली, तर आमदार शिवाजीराव पाटील यांनी गाळ काढण्याच्या प्रस्तावाबाबत नाराजी व्यक्त केली.
यावर पालकमंत्री आबिटकर यांनी नदी खोलीकरण हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा असून जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत पुढील आठवड्यात मुंबईत बैठक घेऊन प्रलंबित प्रस्तावांचा पाठपुरावा केला जाईल, असे सांगितले.
391 गावे पूरबाधित, 88 गावांना भूस्खलनाचा धोका
बैठकीत आपत्ती व्यवस्थापन कक्षाने जिल्ह्यात 391 गावे पूरबाधित असून 88 गावांना भूस्खलनाचा धोका असल्याचे सांगितले. या आव्हानांचा सामना करण्यासाठी 838 जणांचे मनुष्यबळ, शोध व बचाव पथके आणि 488 निवारा केंद्रे सज्ज ठेवण्यात आली आहेत. जिल्हा व तालुका स्तरावर 24 तास नियंत्रण कक्ष कार्यरत असतील.