कोल्हापूर : पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव व कौस्तुभ गावडे यांना कोल्हापूर जिल्ह्यातून मताधिक्याने निवडून देण्याचा निर्धार महायुतीच्या मेळाव्यात करण्यात आला. यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री हसन मुश्रीफ, खा. धनंजय महाडिक, आ. राजेश क्षीरसागर, आ. अमल महाडिक, आ. चंद्रदीप नरके, आ. अशोकराव माने, महापौर रुपाराणी निकम, उपमहापौर अक्षय जरग, माजी आ. सुरेश हळवणकर, माजी आ. संजय घाटगे, महेश जाधव, विजय जाधव यांच्यासह पदाधिकारी. (छाया : पप्पू अत्तार)
कोल्हापूर

Prakash Abitkar | कोल्हापूरची नात व सून म्हणून डॉ. स्मिता जाधव यांना विजयी करूया : पालकमंत्री आबिटकर

सर्वाधिक मताधिक्य देण्यासाठी नियोजन करा महायुतीच्या मेळाव्यात आवाहन

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : कोल्हापूरची नात आणि सून या नात्याने डॉ. स्मिता जाधव यांना पुणे पदवीधर मतदारसंघातून विजयी करूया. कोल्हापुरात सर्वाधिक मताधिक्य देण्यासाठीचे सूक्ष्म नियोजन करा, महायुतीचे दोन्ही उमेदवार निवडून आणणे ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे आवाहन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.

महायुतीचा शिक्षक व पदवीधर मतदारसंघाचा व्यापक मेळावा गुरुवारी भाजपच्या नागाळा पार्क येथील जिल्हा कार्यालयात झाला. पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव व शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्या निवडणूक प्रचाराच्या नियोजनासाठी कोल्हापूर जिल्हा महायुतीच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ होते.

पालकमंत्री आबिटकर म्हणाले, गोकुळसह पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका पाठोपाठ व कमी वेळेत असल्याने गाफील न राहता प्रत्येकाने समन्वय, काटेकोर नियोजन, भक्कम संघटन जपणे आवश्यक आहे. प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचून त्यांना मतपेटीपर्यंत आणण्यासाठीचे सूक्ष्म नियोजन करा.

महायुतीच्या उमेदवारांना विरोधक नसल्याचे चित्र : राजेश क्षीरसागर

राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आ. राजेश क्षीरसागर म्हणाले, मंत्री चंद्रकांत पाटील, शरद लाड यांच्या निवडणुकांचा अनुभव यांसह पदवीधर मतदारसंघात अनेक वर्षे सक्रिय असणाऱ्या भैया माने, अरुण लाड, माणिक पाटील-चुयेकर अशा दिग्गजांचे पाठबळ महायुतीच्या उमेदवारांना लाभले आहे. यामुळे त्यांना विरोधक आहेत की नाहीत, असे चित्र निर्माण झाले आहे. तरीही बेसावध न राहता भक्कम नियोजन करण्याचे आवाहन केले.

दोन्ही निवडणुकांना गांभीर्याने सामोरे जाऊया : खा. महाडिक

पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठीच्या दोन्ही निवडणुका महायुतीसाठी महत्त्वाच्या असल्याने त्यांना गांभीर्याने सामोरे जाण्याचे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केले. पदवीधर मतदारसंघातून प्रथमच महिला उमेदवार आणि सर्वात तरुण उमेदवार निवडून देण्याची संधी महायुतीला मिळाली आहे. दोन्ही उमेदवार सक्षम आणि अभ्यासू असून, त्यांना डॉ. डी. वाय. पाटील, दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांचा वैचारिक वारसा लाभला आहे. दोन्ही मतदारसंघांतील मतदार नुसता राजा नसून राजाचा गुरू आहे. यामुळे प्रत्येक मतदारापर्यंत स्वत: पोहोचून सकाळी ८ ते दुपारी ४ यावेळेत त्याच्याकडून उमेदवारासमोर पसंतीचा १ आकडा व्यवस्थित लिहिण्यापर्यंतची जबाबदारी पार पाडावी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. मेळाव्यात आमदार चंद्रदीप नरके, आमदार अमल महाडिक, आमदार अशोकराव माने, महापौर रुपाराणी निकम, उपमहापौर अक्षय जरग, माजी आ. सुरेश हाळवणकर, माजी आ. संजय घाटगे, महेश जाधव, विजय जाधव, समित कदम, सुजित चव्हाण, भैया माने, माणिक पाटील-चुयेकर, नाथाजी पाटील, रवींद्र माने, माधुरी नकाते यांच्यासह महायुतीचे आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

...तर पहिल्या फेरीतच डॉ. स्मिता जाधव निवडून येतील : मंत्री मुश्रीफ

मंत्री हसन मुश्रीफ यांनी, कोल्हापूरकरांनी मनात घेतले तर पहिल्या फेरीतच डॉ. स्मिता जाधव निवडून येतील, असा विश्वास व्यक्त केला. तसेच डीवायपी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून हजारो पदवीधर घडविणाऱ्या उच्चशिक्षित महिला उमेदवारांना प्रथम निवडून देत नवा इतिहास निर्माण करण्यासाठी सज्ज व्हा. यावेळी डॉ. स्मिता जाधव व कौस्तुभ गावडे यांना कोल्हापुरातून पहिल्या पसंतीच्या मतांनी निवडून आणायचा चंग बांधण्याचे आवाहन त्यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT