कोल्हापूर : चाळीस कोटींची खोटी बिले सादर करून 8 कोटी 50 लाखांचा जीएसटी घोटाळा केल्याचा प्रकार उघडकीस आल्याने कोल्हापूर केंद्रीय जीएसटी गुप्तचर यंत्रणेच्या पथकाने गोवा येथील व्यापारी आर्थिक ललितकुमार जैन (29, रा. वास्को, दक्षिण गोवा) यास शुक्रवारी अटक केली. न्यायालयाने त्यास 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली. संशयिताची कळंबा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
कोल्हापूर येथील केंद्रीय जीएसटी गुप्तचर विभागाचे अधिकारी सुरज पवार, अभिजित भिसे, सौरभ पवार, अविनाश सूर्यवंशी यांच्या पथकाने ही कारवाई केली. 18 ऑक्टोबर रोजी पथकाने गोव्यातील मे. आर्थिक ललितकुमार जैन व मे. ललिता ललितकुमार जैन या फर्मच्या कार्यालय व घरावर छापा टाकला होता. अधिकार्यांनी संशयित जैन यांच्या वापरातील मोबाईलसह अन्य महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली होती.
जप्त मोबाईलच्या फॉरेन्सिक तपासणीदरम्यान जैन यांनी केलेल्या व्यवहारात संशयास्पद नोंदी आढळून आल्या. या अनुषंगाने केलेल्या तपासणीत सुमारे 50 कोटींची खोटी बिले सादर केल्याचे निदर्शनास आले. जैन याने आईच्या नावे असलेल्या गोव्यातील दुसर्या फर्मवरही कर चोरीचा प्रकार केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले होते. गुप्तचर विभागाने याप्रकरणी संशयित जैन यास अटक करून त्याच्याकडे चौकशी केली. शुक्रवारी दुपारी त्यास प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्यांसमोर हजर करण्यात आले असता 14 दिवस न्यायालयीन कोठडी देण्यात आली. कोल्हापूर येथील केंद्रीय गुप्तचर यंत्रणेने गोवा येथे छापा टाकून केलेल्या कारवाईमुळे गोव्यातील व्यावसायिकामध्ये खळबळ उडाली आहे.