कोल्हापूर : कोल्हापूरच्या उद्योग आणि व्यापार क्षेत्रासाठी एक दिलासादायक बातमी आहे. जीएसटीसंदर्भातील अपील सुनावणीसाठी व्यापाऱ्यांना पुणे किंवा अन्य शहरांत धाव घेण्याची गरज पडू नये, यासाठी या सुनावण्या आता कोल्हापुरातच घेण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन केंद्रीय जीएसटी मुख्य आयुक्त नीरज कन्सल यांनी दिले.
कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सच्या पुढाकाराने आयोजित बैठकीत व्यापार-उद्योगांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी कन्सल यांनी सांगितले की, पुणे येथील अपिलीय अधिकारी महिन्यातून एकदा कोल्हापूरला भेट देतील, ज्यामुळे स्थानिक करदात्यांचा वेळ, पैसा वाचेल.
बैठकीत जीएसटी रिफंडच्या समस्यांवरही सकारात्मक चर्चा झाली. कमी जोखीम श्रेणीतील करदात्यांना पोचपावतीनंतर २२ दिवसांच्या आत, तर उच्च जोखीम श्रेणीतील पात्र करदात्यांचे रिफंड ३० दिवसांच्या आत देण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय, लवकरच पुणे येथे ‘जीएसटी अपिलीय न्यायाधीकरण’ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. या बैठकीस कोल्हापूर विभागाचे आयुक्त सुमीत कुमार यादव, चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे उपस्थित होते. करप्रणालीतील तांत्रिक अडचणी आणि धोरणात्मक प्रश्नांसाठी व्यापाऱ्यांनी थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांना ई-मेलद्वारे संपर्क साधावा, असे आवाहनही आयुक्तांनी केले.