विशाळगड : घराघरात पुरणपोळीचा घमघमाट, सजवलेल्या सर्जा-राजाच्या घुंगरांचा मंजूळ नाद आणि त्यांच्याप्रती कृतज्ञतेने ओथंबलेले शेतकऱ्याचे मन... हे चित्र आहे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात उत्साहात साजऱ्या होणाऱ्या बेंदूर सणाचे. वर्षभर शेतात रक्ताचे पाणी करणाऱ्या मुक्या सोबत्यांचे ऋण फेडण्याचा हा दिवस, केवळ एक सण नसून ती एक जिवंत आणि मायाळू परंपरा आहे, जी आजही गावगाड्यांनी मोठ्या अभिमानाने जपली आहे.
शेतीप्रधान भारतीय संस्कृतीत बैलांचे स्थान केवळ एक जनावर म्हणून नाही, तर शेतकऱ्याच्या कुटुंबातील एका सदस्यासारखे आहे. नांगरणीपासून ते पेरणीपर्यंत आणि मळणीपासून ते वाहतुकीपर्यंत, प्रत्येक कामात शेतकऱ्याच्या खांद्याला खांदा लावून राबणाऱ्या या जिवाप्रती आदर व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे बेंदूर. या दिवशी बैलांना पूर्णपणे आराम दिला जातो. त्यांना ना गाडीला जुंपले जाते, ना नांगराला; उलट त्यांची मनोभावे पूजा करून त्यांना लाडाने घास भरवला जातो.
बेंदुराची खरी लगबग आदल्या दिवसापासूनच सुरू होते. या दिवशी बैलांना सजवताना शेतकऱ्याची माया ओसंडून वाहते. आपल्या लाडक्या सोबत्याचे हे सजलेले रूप पाहून शेतकऱ्याच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळतात. घरातील सुवासिनी या सजलेल्या बैलांची आरती ओवाळून त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य भरवतात. अशी केली जाते तयारी...
स्वच्छतेची तयारी : बैलांना नदीवर नेऊन स्वच्छ आंघोळ घातली जाते.
शिंगांचा साज : शिंगांना आकर्षक रंग लावून, त्यावर शिंगोट्या आणि चमकदार बेगडी पट्ट्या बसवल्या जातात.
अलंकार : गळ्यात नवी वेसन, रंगीबेरंगी म्होरकी, सुंदर घुंगुरमाळा, कपाळावर बाशिंग आणि पायात चांदीचे किंवा पितळेचे तोडे घातले जातात.
शाही पोशाख : अंगावर नक्षीदार झुली टाकून त्यांना एखाद्या राजाप्रमाणे सजवले जाते.
बेंदूर सणाची खरी मजा लुटतात ती लहान मुले. आठवडाभर आधीपासूनच माळावरच्या चिकणमातीतून हुबेहूब बैलांच्या प्रतिकृती तयार करण्याची स्पर्धा लागते. या मातीच्या बैलांना सुकवून, त्यावर आकर्षक रंग दिले जातात. गावातील "कुंभार मावशी" पाटीत मातीचे बैल घेऊन घरोघरी फिरायची आणि त्याबदल्यात सुगीच्या दिवसात तिला धान्य मिळायचे, ही आठवण आजही जुनी-जाणती मंडळी सांगतात. दुपारच्या वेळी हीच मुले आपले सजवलेले मातीचे बैल घेऊन गावभर फिरतात आणि हा आनंद द्विगुणीत करतात.
तंत्रज्ञानाच्या युगात शेतीची साधने बदलली असली तरी, बेंदुराचा उत्साह आणि त्यामागील भावना आजही कायम आहे. शाहूवाडीसारख्या अनेक भागांत शेतकरी आजही जातिवंत बैल सांभाळतात, त्यांच्यावर मुलांसारखे प्रेम करतात आणि हा सांस्कृतिक ठेवा अभिमानाने जपतात. बेंदूर हा केवळ एक सण नाही, तर माणूस आणि प्राणी यांच्यातील सुंदर नात्याचा, कृतज्ञतेचा आणि निसर्गाशी एकरूप झालेल्या संस्कृतीचा तो एक अनमोल ठेवा आहे. हा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे हेच आपले खरे कर्तव्य आहे.