कोल्हापूर : शिवछत्रपतींनी निर्माण केलेल्या रयतेच्या स्वतंत्र, सार्वभौम स्वराज्याच्या रक्षणासाठी प्राणार्पण करणाऱ्या स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचा भव्य पुतळा कलानगरी कोल्हापुरात साकारण्यात आला आहे.
तब्बल 25 फुट उंचीचा आणि 5 हजार किलो वजनाचा हा ब्रांझचा पुतळा आहे. कराड येथे नियोजित असणाऱ्या शंभू स्मारकामध्ये हा पुतळा प्रतिष्ठापित करण्यात येणार आहे. शिल्पकार संजीव संकपाळ, अतुल डाके, अनुप संकपाळ आणि त्यांच्या 15 सहकाऱ्यांनी सुमारे दोन वर्षे दिवस-रात्र राबून शंभूराजेंच्या या पुतळ्याची निर्मिती केली आहे. हा पुतळा रेखीव, प्रमाणबद्ध आणि शंभूराजांच्या शौर्याचा इतिहास सांगणारा आहे.
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रोत्साहन-पाठबळ आणि राजाश्रयामुळे कोल्हापुरात कला परंपरा विकसित झाली. यातून अनेक शिल्पकार, चित्रकार, कलाकार निर्माण झाले. बाबुराव पेंटर, रवींद्र मेस्त्री अशा नामवंत कलाकारांचा वारसा जपण्याचे काम कोल्हापुरातील युवा पिढी कर्तव्य भावनेतून करत आहे.