Kolhapur Circuit Bench | सर्किट बेंच इमारतीचे दिमाखदार उद्घाटन Pudhari File Photo
कोल्हापूर

Kolhapur Circuit Bench | सर्किट बेंच इमारतीचे दिमाखदार उद्घाटन

सरन्यायाधीश भूषण गवई यांच्याहस्ते, मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे, उच्च न्यायालयाचे मुख्य न्या. अराधे, सर्किट बेंचचे न्यायमूर्ती कर्णिक, खा. शाहू महाराज, डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला शानदार सोहळा

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच इमारतीचे उद्घाटन रविवारी भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते फीत कापून व कोनशिलेचे अनावरण करून करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती अलोक अराधे, सर्किट बेंचचे न्यायमूर्ती मकरंद कर्णिक, खा. शाहू महाराज, दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, मुंबई उच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्या. चंद्रशेखर, न्या. भारती डांगरे, न्या. मनीष पितळे, न्या. अनिल किलोर, सर्किट बेंचचे न्या. शर्मिला देशमुख, न्या. शिवकुमार दिगे, न्या. एस. जी. चपळगावकर आदींसह उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, महाअधिवक्ता बिरेंद्र सराफ, आ. राजेश क्षीरसागर, आ. चंद्रदीप नरके, आ. शिवाजी पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे, मनपा आयुक्त के. मंजुलक्ष्मी, विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे पुणे विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी सरन्यायाधीश भूषण गवई यांना पोलिस विभागाच्या वतीने गार्ड ऑफ ऑनर दिले. यानंतर सरन्यायाधीश गवई यांच्या हस्ते सर्किट बेंच इमारतीचे फीत कापून उद्घाटन केले. यानंतर राज्याचे महाधिवक्ता, सरकारी वकील यांच्या कार्यालयाचेही त्यांच्याहस्ते उद्घाटन झाले. यानंतर उपस्थित मान्यवरांनी सर्किट बेंच इमारत परिसराची पाहणी करून झालेल्या कामाबद्दल कौतुक केले.

सरन्यायाधीश गवई यांनी सर्किट बेंचमधील तीनही कोर्ट रूमची पाहणी करत त्या न्यायमूर्तींना त्यांच्या आसनावर बसवले. सुमारे तासभर हा सोहळा सुरू होता. यानंतर सर्व मान्यवर मुख्य कार्यक्रमासाठी मेरी वेदर ग्राऊंडकडे रवाना झाले.

सर्किट बेंच इमारत पाहण्यासाठी गर्दी

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परिश्रमातून केवळ एक महिन्यात सर्किट बेंच इमारतींची डागडुजी आणि नूतनीकरण झाले. या इमारतीसह संपूर्ण परिसराचा कायापालट झाला आहे. यामुळे हा परिसर शहराच्या सौंदर्यात भर घालत आहे. उद्घाटन सोहळ्यानंतर सर्किट बेंच इमारत पाहण्यासाठी वकिलांसह अधिकारी, नागरिकांनी गर्दी केली होती. अनेकजण इमारतीचे तसेच नामफलकासमोर छायाचित्र घेत होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT