कोल्हापूर : ढोल-ताशांचा गजर, नेत्रदीपक विद्युत रोषणाई, फटक्यांची आताषबाजी, 'मोरया.. मोरया' असा अखंड जयघोष, आकर्षक रांगोळी आणि हजारो कार्यकर्त्यांचा प्रचंड जल्लोष अशा उत्साही वातावरणात शुक्रवारी रंकाळा वेस येथील गोल सर्कल मित्र मंडळाच्या गणेशमूर्तीचे सायंकाळी कोल्हापूरच्या प्रवेशद्वारावर आगमन झाले. तावडे हॉटेल व महामार्ग परिसरात मिरवणुकीसाठी प्रंचड गर्दी झाली होती. हुल्लडबाज करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी 'प्रसाद' दिला. शहरासह गांधीनगर, पुलाची शिरोली येथील पोलिस कर्मचारी, होमगार्ड तैनात होते.
सायंकाळी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते मिरवणुकीला सुरुवात झाली. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, पुष्पराज क्षीरसागर यांनी 'श्रीं'चे दर्शन घेऊन मिरवणुकीत सहभागी झाले. तावडे हॉटेल चौक येथे कोल्हापूरकरांसह पंचकृषीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाहतुकीची प्रचंड कोंडी, वाहनांच्या रांगा
दुपारी साडेचार वाजल्यापासून कार्यकर्ते, गणेश भक्त तावडे हॉटेल चौकात जमले होते. मिळेल तेथे दुचाकी लावल्यामुळे तावडे हॉटेल चौकासह महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. महामार्गाला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. शहरातून बाहेर पडणाऱ्या तसेच शहरात येणाऱ्या वाहनांची मोठी कोंडी झाली होती. तावडे हॉटेल ते मुस्कॉन लॉन इतक्या छोट्या अंतराच्या मार्गावर झालेली मिरवणूक अडीच तास सुरू होती.