कोल्हापूर : आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी जिल्ह्यातील ग्रामसेवकांच्या वतीने शुक्रवारपासून काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यातील 1,029 ग्रामपंचायतींमधील सर्व ग्रामसेवक या आंदोलनात सहभागी झाले असून, सोमवारी (दि.5) जिल्हा परिषदेसमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. काम बंद आंदोलनामुळे ग्रामपंचायतींमधील कामकाज ठप्प राहिले.
ग्रामविकास विभागाच्या दि. 24 सप्टेंबर 2024 च्या शासन निर्णयाप्रमाणे सुधारीत वेतन श्रेणी लागू करावी, जिल्हा बदली होऊन आलेल्या कर्मचार्यांना शासन निर्णयाप्रमाणे देय असणारी वेतन वाढ मिळावी, पाणीपुरवठा योजना हस्तांतरणाबाबत पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या दि. 4 सप्टेंबर 2020 च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी, आदी मागण्यांबाबत जिल्हा परिषद प्रशासनाशी वारंवार चर्चा करण्यात आली आहे. तरीदेखील त्याला प्रशासनकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने शुक्रवारपासून महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन डी.एन.ई 136 व महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी संघाने काम बंदचा इशारा दिला होता. त्यानुसार शुक्रवारपासून काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले.
यासाठी जिल्ह्यातील ग्रामसेवक सकाळपासून जिल्हा परिषदेजवळील नागोबा मंदिरात एकत्र जमत होते. याठिकाणी बैठक झाली. बैठकीत जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार करण्यात आला. तसेच सोमवारी (दि.5) जिल्हा परिषदेसमोर ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णयही घेण्यात आला. संघटनेच्या पदाधिकार्यांना, ग्रामसेवकांना, मुख्य कार्यकारी अधिकार्यांना उद्धट वागणूक मिळत असल्याची तक्रारही करण्यात आली. यावेळी साताप्पा मोहिते, लक्ष्मण इंगळे, सागर सरावणे, चंद्रकांत सूर्यवंशी, बाबासो कापसे, सुनील खांडेकर, काकासो पाटील, अभिजित चौगुले, दयानंद मोटुरे, सचिन गुरव आदी उपस्थित होते.