Grampanchayt Election 
कोल्हापूर

Gram Panchayat Election | ग्रामपंचायतींचे बिगुल वाजलेः मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर!

एप्रिलमध्ये हरकती; ४ मे रोजी अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध होणार

पुढारी वृत्तसेवा

पेठवडगाव : जानेवारी ते डिसेंबर २०२६ या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राज्य शासनाने प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर केला आहे. ग्राम विकास विभागाने दि. १७ फेब्रुवारी २०२६ रोजी आदेश निर्गमित करून संपूर्ण प्रक्रिया कालबद्ध पद्धतीने राबविण्याचे निर्देश दिले आहेत.

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मधील तरतुदी तसेच सन २०२२ च्या सुधारित अधिनियमाच्या अनुषंगाने हा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांची मुदत संपण्याच्या अनुषंगाने निवडणूक प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने हालचालींना वेग दिला आहे.

प्रारूप प्रभाग रचनेची प्रक्रिया

तहसीलदारांकडून गावनकाशे ‘सुपर इम्पोज’ करून २० फेब्रुवारी २०२६ पर्यंत अंतिम केले जाणार आहेत. त्यानंतर संबंधित गटविकास अधिकारी व ग्रामसेवक यांच्या संयुक्त पाहणीनंतर २७ फेब्रुवारीपर्यंत प्रभाग पाडणे व सीमा निश्चितीची कार्यवाही पूर्ण होईल.

तहसीलदार अध्यक्षतेखालील समितीकडून ५ मार्च रोजी प्रारूप प्रभाग रचनेची तपासणी करण्यात येणार आहे. उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत हा प्रस्ताव ११ मार्च रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर होईल. जिल्हाधिकारी नमुना ‘ब’ तपासून १७ मार्चपर्यंत राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवतील. आयोगाकडून २३ मार्चपर्यंत मान्यता देण्यात येणार असून ३० मार्च रोजी समितीकडून अंतिम मंजुरीची कार्यवाही पूर्ण केली जाईल.

एप्रिलमध्ये हरकतींची सुनावणी

मसुदा प्रभाग रचना ९ एप्रिल २०२६ रोजी प्रसिद्ध करून नागरिकांकडून हरकती व सूचना मागविण्यात येणार आहेत. हरकती सादर करण्याची अंतिम तारीख १३ एप्रिल राहील. प्राप्त हरकती १६ एप्रिल रोजी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठवून २१ एप्रिल रोजी सुनावणी घेण्यात येईल. त्यानंतर अभिप्राय नोंदवून अंतिम प्रस्ताव २३ एप्रिल रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला जाईल.

४ मे रोजी अंतिम प्रसिद्धी

जिल्हाधिकारी २८ एप्रिल रोजी प्रभाग रचना अंतिम करून राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करतील. आयोगाच्या मान्यतेनंतर ४ मे २०२६ रोजी अंतिम प्रभाग रचना नमुना ‘अ’ मध्ये व्यापक प्रसिद्धीस देण्यात येणार आहे. दरम्यान, या कार्यक्रमामुळे राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. प्रशासनाने वेळापत्रकानुसार काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT