गुडाळ : राधानगरी तालुक्यात 9 फेब्रुवारी रोजी मुदत संपलेल्या 19 ग्रामपंचायतीवर शासकीय प्रशासक नियुक्ती रद्द करत मावळत्या सरपंचांना प्रशासक तर उर्वरित सदस्यांना प्रशासक समितीचे सदस्य म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
दरम्यान, ग्रामपंचायत निवडणूक होईपर्यंत किंवा सहा महिने यापैकी कमी असलेल्या कालावधीसाठी प्रशासक समितीची मुदत राहील. या निर्णयामुळे मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीमधील ठप्प झालेले आर्थिक व्यवहार सुरळीत होणार आहेत.
राधानगरी तालुक्यातील गवशी, म्हासुर्ली, कोनोली तर्फ असंडोली, बुरंबाळी, गुडाळ, तळाशी, खिंडी व्हरवडे, नरतवडे, हेळेवाडी, बुजवडे, कंथेवाडी, कोदवडे, आणाजे,पनोरी, पंडेवाडी, ऐनी,राजापूर,चाफोडी तर्फ ऐनघोल सावर्दे या 19 ग्रामपंचायतींच्या निर्वाचित सदस्यांची मुदत 9 फेब्रुवारी रोजी संपली आहे.
या ग्रामपंचायतीवर आर् एन साबळे, एल एन मोहिते,एस एस शिणगारे,एस एस पाटील, एस पी आपटे या पंचायत समितीकडील अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यामार्फत नियुक्ती करण्याचे आदेश काढण्यात आले होते. मात्र राज्यात मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर विद्यमान सरपंच आणि सदस्यांना मुदतवाढ द्या अशी याचिका सरपंच संघटनेने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडे दाखल करत करून प्रशासक नियुक्तीला स्थगिती मिळवली. तसेच संघटनेने मुख्यमंत्र्यांकडेही ही मागणी केली होती.
न्यायालयात या याचिकेची सुनावणी 24 फेब्रुवारी रोजी होणार होती.
मात्र तत्पूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील मुदत संपलेल्या आणि नजीकच्या काळात मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीवर विद्यमान सरपंच आणि सदस्यांची प्रशासकीय समिती नेमण्याचा निर्णय घेतला. मुदत संपलेल्या ग्रामपंचायती च्या प्रभाग रचना आणि अनुषंगिक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी जाहीर केला आहे. त्यानुसार मे किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात या ग्रामपंचायतीं साठी मतदान होण्याचे संकेत आहेत .तो पर्यंत या ग्रामपंचायतीवर प्रशासक समिती काम करणार आहे