कोल्हापूर

घंटागाडीचे स्टेअरिंग ग्रामसेवकाच्या हातात; स्वच्छता अन् वाहतुकीची जबाबदारीही खांद्यावर

रोजंदारीसाठी कर्मचारी मिळत नसल्याचे गावच्या स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे

पुढारी वृत्तसेवा

शिरढोण : येथील ऐतिहासिक उरुसाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीकडून स्वच्छता, आरोग्य आणि वाहतूक व्यवस्थेसाठी विशेष उपाययोजना राबविण्यात आल्या. मात्र स्वच्छता विभागासाठी केवळ दोनच कर्मचारी कार्यरत आहेत. रोजंदारी साठीही कर्मचारी मिळत नसल्याने ग्रामसेवक विराज जथ्ये यांनी स्वतः घंटागाडीचे स्टेअरिंग हातात घेत गावातील कचरा उठाव करत आदर्श कार्यपद्धतीचे दर्शन घडविले.

उरुसासाठी आलेल्या भाविकांना स्वच्छ व निरोगी वातावरण मिळावे, कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी त्यांनी रस्ते, सार्वजनिक ठिकाणे आणि परिसराची स्वच्छता करून घेतली. कार्यालयीन कामकाजासोबत प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करण्याची त्यांची तळमळ ग्रामस्थांच्या कौतुकाचा विषय ठरली. तसेच नुकत्याच पार पडलेल्या उरुस काळात गावातील वाहतूक सुरळीत राहावी, गर्दीचे नियोजन व्यवस्थित व्हावे आणि भाविकांना कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठीही जथ्ये यांनी स्वतः उपस्थित राहून सेवा बजावली.

कर्तव्यदक्ष, तत्पर आणि लोकाभिमुख कार्यशैलीमुळे ग्रामसेवक विराज जथ्ये यांच्यावर ग्रामस्थांकडून कौतुकाचा वर्षाव होत असून, “असा ग्रामसेवक लाभणे हे खऱ्या अर्थाने गावाच्या विकासाचे लक्षण आहे,” अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

गावची १३ हजार लोकसंख्या आहे. केवळ दोन सफाई कर्मचारी आहेत. त्यामुळे आरोग्य व स्वच्छता विभागावर ताण पडला आहे. रोजंदारीसाठीही कर्मचारी मिळत नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे गावच्या स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.तत्काळ अतिरिक्त सफाई कर्मचारी यांची नेमणूक करण्याची मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT