कोल्हापूर : राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी शुक्रवार (दि. २४ जुलै) रोजी प्रसिद्ध होणारी प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी राज्य निवडणूक आयोगाने ऐनवेळी स्थगित केली आहे. या निर्णयामुळे कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यभरातील ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेला तात्पुरता ब्रेक लागला असून, आता आयोगाच्या सुधारित वेळापत्रकाची प्रतीक्षा सुरू झाली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने यापूर्वी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार २४ जुलै रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करून त्यावर हरकती व सूचना स्वीकारण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार होती. त्यानंतर सर्व हरकतींची छाननी करून ४ ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याचे नियोजन करण्यात आले होते.
मात्र, प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्याचाच कार्यक्रम स्थगित करण्यात आल्याने संपूर्ण निवडणूक वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवार, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी तसेच ग्रामपंचायत प्रशासनाचे लक्ष आता आयोगाच्या पुढील निर्णयाकडे लागले आहे.
राज्य निवडणूक आयोगाने सुधारित कार्यक्रम स्वतंत्रपणे जाहीर केला जाईल, असे स्पष्ट केले आहे. मात्र, हा निर्णय कोणत्या कारणास्तव घेण्यात आला, याबाबत आयोगाकडून अद्याप कोणताही अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही. सुधारित वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्याची तारीख, हरकती व सूचना नोंदविण्याची मुदत, अंतिम मतदार यादी जाहीर करण्याचा कार्यक्रम तसेच निवडणुकीच्या पुढील टप्प्यांबाबत स्पष्टता येणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने २४ जुलै रोजी प्रसिद्ध होणारी प्रारूप मतदार यादी स्थगित केल्याने ४ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणाऱ्या अंतिम मतदार यादीच्या कार्यक्रमातही बदल होण्याची शक्यता आहे. आयोगाकडून सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर होणार असून, त्यानंतरच ग्रामपंचायत निवडणुकांच्या पुढील प्रक्रियेला गती मिळणार आहे.