म्हासुर्ली; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील ४७५ ग्रामपंचायतींसाठी मतदान पार पडले. गावच्या विकासाचे व्हिजन डोळ्यासमोर ठेवून उच्च शिक्षित तरुणाईने तर गावच्या राजकारणाची सूत्रे आपल्याच हातात राहावीत म्हणून काही पारंपारिक राजकारण्यांनी यात आपला सहभाग नोंदवला. सरपंचपद थेट जनतेतून असल्याने अनेकांनी कंबर कसली तर अनेकांची प्रतिष्ठा पणाला लागली. साम, दाम, दंड, भेदाच्या चतुसुत्रीतून राजकारणाची खलबते उठली. अनेक ठिकाणी काटाजोड लढतीत एक एक मताने आपले पारडे जड होण्यासाठी मतदारांना जणू पायघड्याच घालण्यात आल्या. टिपेला पोहोचलेला प्रचार तर शिगेला पोहोचलेलल्या उत्साहात प्रचंड इर्षा, कमालीची चुरस लोकांना पहावयास मिळाली.
प्रचाराच्या तोफा थंडावल्या, मतदान पार पडलं, कुणाला संधी मिळणार कुणाची हुकणार याचा लेखाजोखा पेटीबंद झाला. एक्झिट पोल, अंदाज उमेदवार स्वतः आजमावू लागलेत. अशातच करणी भानामतीच्या प्रकारांनी निवडणुकीत काही ठिकाणी मान वर काढली. यामुळे एका वेगळ्याच पायंड्याची सुरुवात झालेली दिसून आली. पण छत्रपती शाहु महाराजांच्या पुरोगामी विचारांच्या जिल्ह्यात हिच लिंबु मिरची खुर्चीची कितपत दिशा फिरवणार हा चर्चेचा विषय ठरला. (Gram Panchayat Election of Kolhapur)
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अगदी सेवा संस्था, दुध संस्थांच्या निवडणुकांसाठी कमालीची चुरस, इर्षा असल्याचे पहावयास मिळते. ग्रामपंचायत निवडणुकीचा तर रुबाबच वेगळा असतो. ग्रामपंचायत म्हणजे गावगाड्यातील विधानसभाच, तर सरपंच म्हणजे गावचे रुबाबदार नेतृत्व.
अनेकांनी सरपंचपदाची खुर्ची अनुभवलेली असते, भोगलेली असते तोच भोग पुन्हाही आपल्याच पदरात पडावा अथवा त्या खुर्चीचा मान आपल्याच नातलगांना मिळावा हि मोठी महत्वाकांक्षा असते. याच महत्वकांक्षेतून साम, दाम, दंड, भेदाच्या चतुसुत्रीद्वारे गावचे राजकारण खेळले जाते. काही गावांमध्ये प्रचंड इर्षा शिगेला पोहोचलेली असते. अगदी त्वेषातून विरोधकाला नेस्तनाबुत करण्याची रणनितीही आखली जाते.
हिच रणनिती काहीवेळा अघोरी कृत्यांचा अवलंब करते, तेव्हा पुरोगामीत्वाला तर लोकशाहीच्या तत्वांनाही तिलांजली दिली गेल्याचे पहावयास मिळते. याच अघोरी कृत्यांचे प्रकार जिल्ह्यात काही ठिकाणी उघडकीस आले. जिल्ह्यातील धामणी खोऱ्यात असे निंदनिय प्रकार निदर्शनास आले. याबाबत लोकांत संताप निर्माण होत आहे, तसेच सोशल मिडिया देखील खेद व्यक्त करण्याची लाट उसळली.
धामणी खोऱ्यात अनेक ठिकाणी बुवा बाजीची दुकाने थाटली आहेत. या दुकानात जाणारा स्वतःचं चांगलं होण्या ऐवजी दुसऱ्याचे वाईट करण्यावर अधिक भर देत असतो. येथून सल्लाही पोषक मिळतोच शिवाय पुढे काळ्या बाहुल्यांच्या खेळ सुरु होतो. याचा परिणाम कितपत होतो हा संशोधनाचा विषय असला तरी अशा कृत्यातून कृत्य करणाऱ्याला पराकोटीचा आनंद मिळत असतो. निवडणुकांचा काळ तर येथील बुवाबाजांसाठी सुगीचा हंगाम असतो.
राधानगरी तालुक्याच्या पश्चिमेकडिल धामणी खोऱ्यात दहा ग्रामपंचायतींसाठी उमेदवार निवडणूक रिंगणात होते. यापैकी राधानगरी तालुक्यातील चौके – कंदलगाव ग्रुप ग्राम पंचायत बिनविरोध झाली असून उर्वरित गगनबावडा तालुक्यात येणाऱ्या नऊ ग्रामपंचायतींसाठी दुरंगी तिरंगी गटांत चुरशीने मतदान पार पडले. प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या येथील एका गावात करणी भानामती झाल्याचा प्रकार उजेडात आला.
अगदी मतदानाच्या पुर्वसंध्येलाच असा प्रकार झाल्याने लोकांच्या भुवया उंचावल्या. हि करणी का केली, कुणी केली, की लोकांतून सहानुभूती मिळवण्यासाठी बनाव करण्यात आला. या बाबत लोकांतून मतमतांतरे व्यक्त होत असली तरी असा प्रकार निंदनिय घृणास्पद असल्याचे बोलले जात आहे. ज्यांच्या मागे जनाधार त्यांची नाही होणार हार अशा आशयाचे मेसेज सोशल मिडिया वरुण फिरत आहेत. तरीही काळा दोरा, लिंबु मिरचीत खुर्ची फिरवण्याची ताकद कितपत असणार आहे हे मंगळवारच्या निकालातून स्पष्ट होणार आहे.
हेही वाचा