Graduate Constituency Election | ‘पदवीधर’ची मतदान प्रक्रिया समजून घ्या 
कोल्हापूर

Graduate Constituency Election | ‘पदवीधर’ची मतदान प्रक्रिया समजून घ्या

निवडणूक निर्णय अधिकारी शीतल तेली; मतदारांना मतपत्रिकेत पसंती क्रमांक द्यावा लागणार

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : विधानपरिषद निवडणुकीत मतदान पद्धती आणि आयोगाच्या अन्य सार्वत्रिक निवडणुकात मतदानाची पद्धत यात मूलभूत फरक आहे. पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत मतपत्रिकेवर उमेदवारांच्या नावापुढे संतीक्रम नोंदवावा लागणार आहे. जितके उमेदवार निवडणूक लढवित असतील अशा सर्वांपुढे पसंतीक्रम नोंदविता येतो. मतदानाच्या या वेगळ्या पद्धतीमुळे मतदारांनी आणि विशेषत: प्रथमच मतदान करणाऱ्यांनी ही पद्धत जाणून योग्यरितीने मतदान करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी केले आहे.

असे करा मतदान

१. मतदानासाठी मतपत्रिकेबरोबर दिलेल्या जांभळ्या रंगाचे स्केच पेनच वापरावे. अन्य कोणतेही पेन, पेन्सिल, बॉलपॉईन्ट पेन आदी वापरू नये. प्रथम पसंतीच्या उमेदवाराच्या नावासमोर १ असा आकडा लिहावा. १ आकडा फक्त एकाच उमेदवाराच्या नावासमोर द्या. तो एकाच वेळी वापरता येईल.

२. निवडून द्यावयाच्या उमेदवारांची संख्या विचारात न घेता जेवढे उमेदवार असतील तेवढे पसंतीक्रम देता येतील. उमेदवाराच्या नावासमोर फक्त एकच आकडा घातलेला आहे आणि तोच आकडा एकापेक्षा अधिक उमेदवारांच्या नावासमोर घातलेला नाही याची खात्री करा.

३. पसंतीक्रम फक्त १, २, ३ इत्यादी आकड्यांमध्येच लिहावा. एक, दोन, तीन असे शब्दांत लिहू नये. पसंतीक्रमाचे आकडे भारतीय अंकाच्या 1, 2, 3 इत्यादींसारख्या आंतरराष्ट्रीय रुपात किंवा I, II, III इत्यादींसारख्या रोमन रुपात किंवा १, २, ३ अशा देवनागरी रुपात किंवा संविधानाच्या अनुसूची आठमधील मान्यता दिलेल्या कोणत्याही एका भारतीय भाषेमध्ये वापरण्यात येणाऱ्या रुपामध्ये देता येतील.

४. मतपत्रिकेवर मतदाराने आपले नाव, आद्याक्षरे किंवा अन्य शब्द लिहू नयेत किंवा स्वाक्षरी करु नये. तसेच आपल्या अंगठ्याचा ठसा देखील उमटवू नये. असे केल्यास मतत्रिका अवैध ठरेल.

५. पसंतीक्रम सांगण्यासाठी उमेदवाराच्या नावासमोर √ किंवा X अशी खूण पुरेशी नाही. पसंतीक्रम फक्त अंकातच द्यावा. एकूण उमेदवारांपैकी एका उमेदवारासमोर १ हा आकडा लिहिणे आवश्यक आहे. इतर पसंतीक्रम ऐच्छिक आहेत.

या मतपत्रिका अवैध ठरतील

१. पसंतीचा १ हा आकडा घातलेला नसल्यास.

२. १ हा आकडा एकापेक्षा अधिक उमेदवारांच्या नावासमोर घातलेला असल्यास.

३. १ हा आकडा, तो कोणत्या उमेदवाराला देण्यासाठी घातलेला आहे याबाबत शंका निर्माण होईल अशाप्रकारे घातलेला असेल.

४. एकाच उमेदवाराच्या नावासमोर

१ आणि त्याबरोबर २, ३ इत्यादी आकडे घातलेले असल्यास पसंतीक्रम आकड्याऐवजी शब्दांमध्ये दर्शवलेला असेल.

५. मतदाराची ओळख पटू शकेल

अशी कोणतीही खूण किंवा लेखन असल आणि असे आकडे घालण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्याने दिलेल्या जांभळ्या रंगाच्या स्केच पेन व्यतिरिक्त अन्य साधनाने कोणताही आकडा घातलेला असेल.

‘पदवीधर’साठी ओमप्रकाश बकोरिया, ‘शिक्षक’साठी रूचेश जयवंशी निवडणूक निरीक्षक

पुणे विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी निवडणूक निरीक्षक म्हणून ओमप्रकाश बकोरिया यांची नियुक्ती केली आहे. त्यांचा निवासाचा पत्ता ‘सिंहगड’, व्हीव्हीआयपी सर्कीट हाऊस, बंडगार्डन पुणे असा असून त्यांचा मोबाईल क्र. ९१८५१०३३९३ असा आहे. निवडणूक निरीक्षक यांना व्हीव्हीआयपी सर्कीट हाऊस येथे सकाळी सकाळी १० ते ११ या कालावधीत भेटता येईल. तसेच मोबाईल क्रमांकावर संपर्क साधता येईल. निवडणूक निरीक्षक यांचे संपर्क अधिकारी मनोज ठाकरे हे असून त्यांचा संपर्क क्र. ९९६०९९५०६२ असा आहे, जयवंशी यांचा निवासाचा पत्ता ‘शिवनेरी’, व्हीव्हीआयपी सर्कीट हाऊस, बंडगार्डन पुणे असा असून त्यांचा मोबाईल क्र. ८२०८३८७७६९ असा आहे. निवडणूक निरीक्षक यांना व्हीव्हीआयपी सर्कीट हाऊस येथे सकाळी सकाळी ११ ते दुपारी १२ या कालावधीत भेटता येईल. तसेच या क्रमांकावर संपर्क साधता येईल. निवडणूक निरीक्षक यांचे संपर्क अधिकारी अनिल बडे हे असून त्यांचा संपर्क क्र. ९२८४०५८४११ असा आहे.

एमसीएमसी समिती कार्यान्वित

पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हास्तरीय माध्यम संनियंत्रण आणि प्रमाणीकरण समिती (एमसीएमसी) कार्यान्वित करण्यात आली आहे. निवडणूक प्रचारासाठी उपयोगात आणले जाणारे बल्क एसएमएस, रेकॉर्डेड व्हाईस मेसेजेस, इलेक्ट्रॉनिक माध्यमातील तसेच सर्व प्रकारच्या डिजिटल मीडिया जाहिराती यांना जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समितीकडून (एमसीएमसी) प्रमाणीकरण करुन घेणे बंधनकारक आहे, असे विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी शीतल तेली-उगले यांनी सांगितले.

प्रमाणित करावयाच्या जाहिरातीचा मजकूर इलेक्ट्रॉनिक स्वरुपात आणि दोन प्रतीत संहितेसह समितीकडे प्रसारणाच्या ३ दिवस अगोदर सादर करावा. उमेदवारांच्या राजकीय जाहिरातींच्या प्रमाणीकरणासाठी जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समितीशी (एमसीएमसी) संबंधित जिल्ह्यातील जिल्हा माहिती कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन निवडणूक प्रशासनाने केले आहे.

मतदारांना मतदानासाठी विशेष नैमित्तिक रजा

पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी शुक्रवार, दि.२३ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. या दिवशी भरपगारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. निवडणुकीत मतदार असलेल्या पदवीधर व शिक्षक मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५१ मधील कलम १३५ ब नुसार भरपगारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ही रजा त्यांच्या अनुज्ञेय असलेल्या नैमित्तिक रजेव्यतिरिक्त असणार आहे. ही विशेष नैमित्तिक रजा खाजगी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या मतदारांना लागू होणार नाही. या निवडणुकीकरिता खासगी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या पदवीधर, शिक्षक मतदारांना मतदानासाठी दोन तासांची विशेष सवलत देण्यात यावी, असे विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली -उगले यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT