kolhapur | थरावर थर गोविंदांचा... सत्तेची हंडी फोडण्याचा! Pudhari File Photo
कोल्हापूर

Govinda festival 2025 | थरावर थर गोविंदांचा... सत्तेची हंडी फोडण्याचा!

राजकीय टोलेबाजी व शक्तिप्रदर्शनाने गाजणार गोविंदा

पुढारी वृत्तसेवा

चंद्रशेखर माताडे

कोल्हापूर : कोल्हापुरात दरवर्षी रंगणार्‍या व चुरशीने होणार्‍या दहीहंडी उत्सव यंदा महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय शक्तिप्रदर्शनाने रंगणार आहे. शहरात राजकीय पक्षांच्या वतीने होणारा दहीहंडी उत्सव नेहमीच राजकीय टोलेबाजी व आरोपांच्या फैरीनी गाजत असतो. यंदा सत्तेची हंडी फोडण्यासाठी नेत्यांची व कार्यकर्त्यांची ईर्ष्या पणाला लागली आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी दहीहंडी या टॅगलाईनने धनंजय महाडिक यांनी दसरा चौकात दहीहंडी सुरू केली. या व्यासपीठावरून होणारी राजकीय टोलेबाजी व प्रतिस्पर्ध्याला दिले जाणारे आव्हान कायमच राजकीय विश्लेषकांसाठी लक्षवेधी ठरले आहे. त्याचबरोबर या व्यासपीठावर कोणाची उपस्थिती असते व कोण गैरहजर असते यावरून पुढील राजकीय अंदाजही वर्तविले जातात.

राजकीय आरोपाने गेल्या वर्षीचा उत्सव गाजला

गेल्यावर्षीच्या दहीहंडी उत्सवात राजकारण्यांचा धंदा करणार्‍यांचा चेहरा ओळखा, अशा शब्दांत धनंजय महाडिक यांनी राजकीय विरोधकांवर प्रहार केला होता. मात्र त्याहीपेक्षा गाजली ती व्यासपीठावरची उपस्थिती. महाडिक यांचे कधीकाळी राजकीय विरोधक असलेले हसन मुश्रीफ, राजेश क्षीरसागर, माजी खासदार संजय मंडलिक, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर आदींची उपस्थिती चर्चेचा विषय ठरली. कारण गोकुळमध्ये महाडिक व मुश्रीफ यांच्यात तर कोल्हापूर महापालिकेत महाडिक व क्षीरसागर यांच्यात राजकीय संघर्ष झाला होता. मात्र राज्यातील सत्तांतरानंतर ते बदलत्या राजकारणात एकत्र आले होते. गोकुळ व महापालिकेत यापूर्वीच्या राजकारणावर बोलणार नाही, असे हसन मुश्रीफ यांनी सांगितले. कारण बदलत्या राजकारणाने त्यांना एकत्र आणले आहे.

आता यंदा दोनवेळा दहीहंडी उत्सव होत आहे. परंपरेनुसार दि.16 रोजी दहीहंडी उत्सव होईल, तर महाडिक यांनी दि. 24 रोजी याचे आयोजन केले आहे. उत्सवात गर्दी विभागली जाते. मात्र स्वतंत्र दहीहंडी उत्सवातून राजकीय शक्तिप्रदर्शन ताकदीने करता येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

उत्सवाला राजकीय आश्रय

कोल्हापूरच्या दहीहंडीला राजकीय आधार आहे. मध्यवर्ती शिवाजी चौक येथे राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या वतीने दहीहंडी उत्सव होतो. तर ठाकरे शिवसेनेच्या वतीने मिरजकर तिकटी येथे दहीहंडीचे आयोजन केले जाते. मिरजकर तिकटी हा नवे राजकीय व्यासपीठ आकाराला आले आहे. सध्या याच ठिकाणी नेत्यांच्या सभा होत असतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT