kolhapur ITI New Age Courses | शासकीय आयटीआयमध्ये ‘न्यू एज कोर्सेस’ 
कोल्हापूर

kolhapur ITI New Age Courses | शासकीय आयटीआयमध्ये ‘न्यू एज कोर्सेस’

यंदापासून अंमलबजावणी; थ्री-डी प्रिंटिंग, इंडस्ट्रीयल रोबोटिक्सचा समावेश

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) कोल्हापूर येथे उद्योग क्षेत्राच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन यंदापासून ‘न्यू एज कोर्सेस’ सुरू करण्यात येणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण मिळणार आहे. कौशल्य व उद्योजकता विकास विभागाच्या निर्णयानुसार हे अभ्यासक्रम २०२५-२६ च्या प्रवेश प्रक्रियेत उपलब्ध करण्यात आले आहेत.

शासकीय आयटीआयमध्ये प्रवेश सत्र २०२६ साठी १ हजार ३१६ जागा उपलब्ध आहेत. एक वर्ष मुदतीचे ८, अभियांत्रिकी व्यवसाय, एक वर्ष मुदतीचे ६ बिगर अभियांत्रिकी व्यवसाय तर दोन वर्ष मुदतीचे १६ अभियांत्रिकी व्यवसायासाठी प्रवेश उपलब्ध आहेत. सद्यस्थितीमध्ये ५ कार्यशाळेमधून ३१ व्यवसाय चालवले जात आहेत. एक वर्ष व दोन वर्ष अभ्यासक्रमाच्या २ हजार १८४ प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे.

आता पारंपरिक अभ्यासक्रमांसोबत टेक्निशियन, मॅकेट्रॉनिक्स, थ्री-डी प्रिटिंग, इंडस्ट्रीयल रोबोटिक्स आणि डिजिटल मॅन्युफॅक्चरिंग टेक्निशयन हे अत्याधुनिक अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. उद्योग क्षेत्रात ऑटोमेशन, रोबोटिक्स, डिजिटल मॅन्युफॅक्चरिंग आणि थ्री-डी प्रिंटिंगचा वाढता वापर लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख व कौशल्याधारित शिक्षण देणे हा उद्देश आहे. या अभ्यासक्रमांमुळे प्रशिक्षणार्थ्यांच्या रोजगाराच्या संधी वाढण्यास मदत होणार असून, उद्योगांच्या गरजेनुसार प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होईल.

अत्याधुनिक नवीन तंत्रज्ञानावर आधारित अभ्यासक्रमांसाठी आवश्यक कार्यशाळा, आधुनिक यंत्रसामग्री व उपकरणांची उपलब्धता करण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा सुरू आहे. सर्व सुविधा उपलब्ध होताच प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.
महेश आवटे, प्राचार्य, शासकीय आयटीआय, कोल्हापूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT