कोल्हापूर : राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांचे ऑडिट (मूल्यांकन) केले जाणार आहे. यासाठी राष्ट्रीय स्तरावरील आरोग्य क्षेत्रातील संस्था ‘आरोग्य सेवा मूल्यमापन यंत्रणा’ म्हणून काम करणार आहे. लवकरच ही संस्था निश्चित करून प्रत्यक्ष मूल्यमापनाचे काम सुरू केले जाणार आहे.
राज्यात प्रत्येक जिल्ह्यात ग्रामीण व शहरी भागात दोन टप्प्यांवर विविध प्रकारच्या सार्वजनिक आरोग्य सेवा दिल्या जातात. प्राथमिक स्तरावर आरोग्य उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र याद्वारे माता व बालकांच्या विविध सेवा, असंसर्गिक आजार, स्क्रीनिंग, राष्ट्रीय आरोग्यसेवेचे कार्यक्रम, जोखमीचे रुग्ण ओळखून पुढील उपचारासाठी पाठविणे आदी काम केले जाते. द्वितीय स्तरावर जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयाद्वारे उपचार केले जातात. या सर्व रुग्णालयांचे मूल्यांकन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
आरोग्य संस्थांमध्ये उपलब्ध मनुष्यबळ, त्यांचे तांत्रिक ज्ञान, औषधांची उपलब्धता, यंत्रसामग्रीची उपलब्धता, वापर याबाबत सविस्तर माहिती घेतली जाणार आहे. वैद्यकीय अधिकारी, ए.एन.एम., इतर आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका इत्यादींना काम करताना येणार्या अडचणींबाबतही यंत्रणा चर्चा करणार आहे.
रुग्णांशी संवाद साधत सेवेबाबत माहिती घेतली जाईल. संस्थेतील उत्कृष्ट सेवांचाही अभ्यास केला जाईल. याखेरीज ही यंत्रणा लोकांशी, लोकप्रतिनिधीशी, सामाजिक संस्थेच्या प्रतिनिधीशी चर्चा करणार आहेत. मूल्यमापन केल्यानंतर जिल्हा व शहरनिहाय अहवाल तयार केला जाणार आहे.
सार्वजनिक आरोग्य सेवेचे वस्तुनिष्ठ परीक्षण हा मूल्यमापनाचा उद्देश आहे. आरोग्य संस्थांच्या माध्यमातून दिल्या जाणार्या सेवा अपेक्षित मानकांप्रमाणे आहेत की नाही, आरोग्यसेवेच्या क्षमता, कमतरता, सेवा देताना येणार्या अडचणी शोधल्या जाणार आहेत. यामध्ये सुधारणा आणि सेवांचे बळकटीकरण करण्यासाठी उपाययोजना सुचविणे हा या मूल्यांकनाचा उद्देश आहे.