राज्यातील शासकीय रुग्णालये अद्ययावत करणार : प्रकाश आबिटकर  
कोल्हापूर

राज्यातील शासकीय रुग्णालये अद्ययावत करणार : प्रकाश आबिटकर

'आरोग्‍य विभागातील मनुष्‍यबळही वाढविणार'

पुढारी वृत्तसेवा

इस्लामपूर : पुढारी वृत्तसेवा

आरोग्य विभागाच्या सर्व योजना प्रभावीपणे राबविण्याबरोबरच या विभागात मनुष्यबळ वाढवून राज्यातील सर्व शासकीय आरोग्य केंद्रे अद्यावत करण्यावर भर दिला जात आहे. जेणेकरुन या केंद्रातून सामान्य लोकांच्या बरोबरच उच्चभ्रू लोकही उपचारासाठी आल्याचे चित्र येत्या सहा महिन्यात राज्यभर दिसेल, असा विश्वास आरोग्य मंत्री ना. प्रकाश आबीटकर यांनी येथे पत्रकार बैठकीत बोलताना व्यक्त केला.

शुक्रवारी ना. प्रकाश आबीटकर यांनी इस्लामपूर नगरपालिकेस भेट देवून कामकाजाचा आढावा घेतला. त्यानंतर ते पत्रकार बैठकीत बोलत होते. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, मुख्याधिकारी राहूल मर्ढेकर, तहसीलदार सचीन पाटील, बांधकाम अभियंता रमेश पाटील, डॉ. नरसिंह देशमुख, डॉ.अशोक शेंडे, माजी नगरसेवक अमीत ओसवाल, मनसेचे सनी खराडे, गजानन फल्ले आदी प्रमुख उपस्थित होते.

ना.आबीटकर म्हणाले, आरोग्य विभागाच्या अनेक लोकाभिमुख योजना आहेत. मात्र त्याची प्रत्यक्षात प्रभावी अमंलबजावणी होताना दिसत नाही. या योजनांच्यावर भरमसाठ निधी खर्च होत आहे. मात्र सामान्य रुग्णांना त्याचा लाभ होताना दिसत नाही. कोरोनाकाळात शासकीय आरोग्य यंत्रणेचे महत्त्व सगळ्यांनाच कळाले आहे. त्यामुळे आरोग्य विभाग आधुनिक करण्याबरोबरच शासकीय रुग्णालयातील मनुष्यबळ वाढविण्यावर भर दिला जात आहे.

पुढे ते म्हणाले की, इस्लामपूर नगरपालीकेची नुतन इमारत व भाजी मार्केटचे बांधकाम काही तांत्रिक अडचणीमुळे थांबले आहे. जिल्हाधिकार्यांशी चर्चा करुन हा प्रश्न मार्गी लावला जाईल. हे काम लवरच सुरु होईल. तसेच रखडलेला शहराचा विकास आराखडाही मंजुर करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करू. नवीन पाणी पुरवठा योजनाही मार्गी लावली जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामार्फत लागेल तो निधी आणून इस्लामपूर शहराचा विकास करण्यासाठी मी व आनंदराव पवार प्रयत्न करु, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. नगरपालीकेचे शहराबाहेर असलेले शहरी आरोग्य केंद्र शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आणावे. जेणेकरुन या रुग्णालयाचा जास्तीतजास्त रुग्णांना लाभ होईल अशी मागणी आनंदराव पवार यांनी यावेळी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT