कोल्हापूर : सहकारी साखर कारखान्यांना राष्ट्रीय सहकार विकास निगमच्या (एनसीडीसी) माध्यमातून राज्य सरकारमार्फत दिल्या जाणाऱ्या कर्जाच्या निकषांमध्ये राज्य शासनाने मोठे बदल केले आहेत. कर्जाची परतफेड पूर्ण होईपर्यंत कारखान्यांच्या तिजोरीवर म्हणजेच आर्थिक व्यवहारांवर शासनाचे नियंत्रण राहणार आहे. एका कारखान्याला जास्तीत जास्त १०० कोटी रुपयांपर्यंतच कर्ज उपलब्ध होणार आहे. साखर आणि इथेनॉल विक्रीतून ठरावीक रक्कम थेट कर्जखात्यात जमा करणे, नवीन प्रकल्पांसाठी पूर्वपरवानगी घेणे आणि स्वतंत्र लेखापरीक्षण करून घेणेही बंधनकारक करण्यात आले आहे.
सहकार विभागाने २७ नोव्हेंबर रोजी यासंदर्भात शुद्धिपत्रक जारी केले. या निर्णयामुळे सहकारी साखर कारखान्यांच्या कर्जवाटपापासून ते परतफेडीपर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेत आर्थिक शिस्त आणि देखरेख अधिक कठोर होणार आहे. या योजनेंतर्गत आतापर्यंत ३६ सहकारी साखर कारखान्यांच्या ४१ कर्जप्रकरणांना एकूण ५ हजार ४८८ कोटी ८४ रुपयांचे आर्थिक सहाय्य मंजूर करून वितरित करण्यात आले आहे. मात्र, अनेक कारखान्यांकडील मुद्दल आणि व्याजाची थकबाकी वाढत असल्याने शासनासमोर वसुलीचे आव्हान निर्माण झाले आहे.